भातखरेदी केंद्राला मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:41 IST2019-11-15T00:41:03+5:302019-11-15T00:41:06+5:30
अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही.

भातखरेदी केंद्राला मुहूर्त कधी?
मुरबाड : अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेल्या भातपिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे.
एकमेव भातशेतीवर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण, आरोग्य सांभाळताना दमछाक सुरू असताना यावर्षी निसर्गाचा कोप झाला. खरीप हंगामातील खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी सेवा संस्थांचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी तगादा लागण्याची शक्यता आहे. पदरात पडलेले धान्य खरेदी-विक्र ी संघ अथवा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने पंचाईत झाली आहे.
शेतकरी यावर्षी तर जास्तच संकटात सापडला आहे. अवकाळी पावसात आणेवारी घटली. त्यातच भात भिजल्याने ते काळे पडले आहे आणि मोडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या लागवडीसाठी उचललेले सरकारी कर्ज फेडण्यासाठी पिकलेले भात काळे असल्याने खाजगी व्यापारी घेत नाहीत. त्यातच आदिवासी विकास महामंडळ व खरेदी-विक्री संघाचा काटा लागत नसल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने त्वरित महामंडळाला आदेश काढून भातखरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
>भातखरेदी करण्यासाठी सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी करता येत नाही.
- सदानंद राजुरे, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ
सरकारचे आदेश प्राप्त न झाल्याने भातखरेदी केंद्र सुरू करता आले नाही. - श्यामकांत भानुशाली, सचिव, मुरबाड तालुका
खरेदी-विक्र ी संघ