शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल?

By Admin | Updated: January 24, 2017 05:45 IST2017-01-24T05:45:06+5:302017-01-24T05:45:06+5:30

मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने

What else will be in Shivsena's nod? | शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल?

शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल?

ठाणे : मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत, लवकरच ठाण्याच्या मेकओव्हरचा वचननामा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. आधीच मालमत्ता करमाफी, शाई धरण पूर्ण करणे, मोफत आरोग्यसेवा, सेंट्रल पार्क या पलीकडे शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. शिवसेनेतील एकंदरीत हालचाली पाहता भाजपाला वगळून पक्षाने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.
मुंबईत युतीबाबतची बोलणी सुरु असून तीन बैठकानंतरही भाजपा १४४ जागांवर ठाम आहे. परंतु शिवसेनाही भाजपाला जादा जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच, ठाण्यातही शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत त्यानुसारच स्वत:चा वचननामा तयार केला आहे. प्रत्यक्षात तो जरी अजून प्रसिद्ध झाला नसला, तरी आता मुंबईपाठोपाठ शिवसेनेने ठाण्यातही वेगळे होण्याची तयारी सुरु केल्याचे दिसते.
मुंबईत रविवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या धर्तीवर ठाणे आणि उल्हासनगरलाही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली. तसेच, आरोग्य सुरक्षाकवच योजनाही जाहीर केली. याशिवाय पारसिक चौपाटी, सेंट्रल पार्क, जलवाहतुक आदी मुद्यांना देखील त्यांनी हात घातला. याचाच अर्थ शिवसेनेने ठाण्यातही मुंबईच्या धर्तीवर युती न करता स्वबळाचा पर्याय हाती घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
शिवसेना जाहीर करीत असलेल्या काही प्रकल्पांना नवा मुलामा चढवण्यात आला आहे. यातील काही प्रकल्प पालिकेचे, काही राज्य आणि केंद्राच्या सहकार्याने होणार आहेत. त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये म्हणूनच शिवसेनेने लगीनघाई केल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: What else will be in Shivsena's nod?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.