बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST2021-05-26T04:39:56+5:302021-05-26T04:39:56+5:30
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी बारावीच्या परीक्षांबाबत ...

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून, शासन त्याच्या पर्यायांबाबत विचार करत आहे; मात्र विद्यार्थी वर्ग आणि पालक संभ्रमात आहेत.
दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्या परीक्षांबाबतही तितकीच उत्सुकता विद्यार्थी, पालकांमध्ये असते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यातही दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले; मात्र मे महिना उलटून गेला तरी बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही. दरवर्षी साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकालही जाहीर होतो; मात्र यंदा अद्याप परीक्षांबाबत निर्णय न झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आता या बारावीच्या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
--------------
-----------------
विद्यार्थ्यांचे कोट
दरवर्षी बारावीच्या परीक्षा झाल्यावरच्या काळात विद्यार्थी इतर प्रवेश परीक्षांची तयारी करतात; मात्र यंदा कालावधीपण निघून गेला, अजून बारावीची परीक्षा झाली नाही. याच्यापुढे इतर परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार आणि नवे वर्ष कधी सुरू होणार, काहीच कळत नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात.
दीक्षा वाकटे, विद्यार्थिनी
---------------
बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात. आमच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्या घेतल्या नाही, हे योग्य; पण त्याला पर्यायी विचार करायला हवा होता. अजून ठोस निर्णय झालेला नाही, आम्ही विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास आता कोणत्या परीक्षांचा करावा, हाही प्रश्नच पडला आहे.
रमण बनकर, विद्यार्थी
--------------
----------------
शिक्षणतज्ज्ञ कोट
बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणांच्या आधारे त्यांचे मू्ल्यांकन करता येईल. तसेच प्रवेशाच्यावेळी बारावीच्या गुणांचे निकष न लावता विविध कोर्सच्या प्रवेश परीक्षा घेता येतील, असे मत एका शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
-----------
आता बराच उशीर झाला आहे. बारावीच्या परीक्षा घेऊन नंतर कधी निकाल, प्रवेश परीक्षा घेणार, त्यापेक्षा परीक्षा रद्द करून इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेता येतील. विद्यार्थ्यांनाही त्या दृष्टीने अभ्यास करता येईल, असे मला वाटते. एकूणच शासनाला जो योग्य वाटेल तो पर्यायी मार्ग याबाबत सुचवावा, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.
------
-----------
विद्यार्थी संख्या
१२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
ठाणे मनपातील विद्यार्थी - १७७६३
ठाणे जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ८६००३