कल्याणला जल्लोषात नववर्ष स्वागत
By Admin | Updated: March 29, 2017 05:23 IST2017-03-29T05:23:56+5:302017-03-29T05:23:56+5:30
हिंदू नववर्षानिमित्त मंगळवारी शहरात काढलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत एकच जल्लोष पाहावयास मिळाला.

कल्याणला जल्लोषात नववर्ष स्वागत
कल्याण : हिंदू नववर्षानिमित्त मंगळवारी शहरात काढलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत एकच जल्लोष पाहावयास मिळाला. या यात्रेत ‘स्वच्छ, सुंदर व हरित कल्याण’च्या जागृतीवर अधिक भर देण्यात आला.
‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे दरवर्षी शहरात स्वागत यात्रा काढली जाते. यंदा शहरातील याज्ञवल्क्य संस्थेला ६० वर्षे पूर्ण झाल्याने स्वागत यात्रेचे प्रोयोजकत्व या संस्थेला देण्यात आले होते. सिंडीकेट चौकात उभारलेल्या नववर्षाच्या गुढीचे मान्यवरांनी पूजन केले. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, भाजपा आ. नरेंद्र पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू नरेश चंद्र, शिवसेना नगरसेविका वीणा जाधव, स्वागत यात्रेचे आयोजक राधाकृष्ण पाठक, डॉ. सुरेश एकलहरे, मिलिंद कुलकर्णी, माजी महापौर वैयजंती घोलप, माजी नगरसेविका वंदना गीध, कल्याण सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष राजीव जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. नरेश चंद्र यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘संस्कार भारती’ने रांगोळीद्वारे ‘किल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा’चा संदेश दिला. म्हस्कर रुग्णालयानजीक काढलेल्या रांगोळीद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच केडीएमटीतील अनुकंपा तत्वावरील नोकरभरती कधी केली जाईल, असाही प्रश्न उपस्थित करत त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष्य वेधण्यात आले होते. ‘तापमान वाढते आहे, आत्ता तरी जागे व्हा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा,’ असा सूचक संदेश देणारा चित्ररथ ‘साई संकल्प प्रतिष्ठान’ने साकारला होता. स्वागतयात्रेच्या प्रारंभी बैलगाडीवर सरस्वतीचे चित्र असलेला बॅनर होता. त्याच गाडीत सनई चौघड्याचे वादन केले जात होते.
स्वागत यात्रेत गजानन महाराज सेवा मंडळातर्फे भजन, कीर्तन सादर केले जात होते. अखिल भारतीय नाट्य परिषद, सुभेदार वाडा शाळा, गुरुकूल शाळा, वैश्य समाज, डॉक्टर रुग्ण, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मनशक्ती, ब्रह्मकुमारी, सॅटर्डे क्लब, रोटरी क्लब, बजरंग दल, पाठारे नर्सरी आदींचे चित्ररथ सहभागी झाले होते. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर-रुग्ण संबंध चांगले असावेत, असा संदेश ‘डॉक्टर मित्र’तर्फे देण्यात आला.
नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक होते. तलवार आणि ढाल घेऊन बसलेल्या महिला व मुली घोड्यावर स्वार झाल्या होत्या. त्यात ‘जय मल्हार’ची वेशभूषा केलेला मुलगा सगळ््यांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच काही महिला नऊवारी साडी नेसून दुचाकीवर स्वार झाल्या होत्या. सरस्वती विद्यालय व माजी महापौर वैजयंती घोलप यांनी यात्रेतील मान्यवरांवर पुष्पवृष्टी करून यात्रेचे जंगी स्वागत केले. शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी फटाके वाजवून यात्रेचे जोरदार स्वागत केले. अनेक सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी पाणी, सरबत आणि अल्पोहाराची सोय केली होती.
स्वागत यात्रेचा खरा उत्साह हा टिळकचौक, पारनाका, लाल चौकी या भागात दिसून आला. या परिसरात स्वागत यात्रेत जास्त गर्दी दिसून आली. स्वागत यात्रेत ढोलताशे पथकांना मज्जाव करण्यात आला होता. यात्रेची सुरुवात ‘प्रारंभ’ ढोलताशा पथकाने केली. त्यानंतर पारनाका, टिळकचौक, लाल चौकी परिसरात ढोलताशा पथके यात्रेत सहभागी झाली. ‘शिवसंभो,’ ‘शिव सह्याद्री,’ ‘वेदमंत्र, महाकाल’ या ढोलताशा पथकांनी यात्रा निनादून सोडली. यात्रेची सांगता नमस्कार मंडळाच्या प्रांगणात झाली. तेथेही ढोल ताशांचे जोरदार वादन झाले. (प्रतिनिधी)
डिजेवरून पोलीस-आमदारांमध्ये वाद
अहिल्या देवी चौकात महेश घोणे हा तरुण डिजे लावण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला मज्जाव केला. या कारणावरुन पोलीस व भाजपा आमदार नरेंद्र पवार यांच्या वाद झाला. पोलिसांनी मनाई करताच पवार यांनी त्यांना चांगलाच दम भरला. मात्र, पोलिसांनी घोणे याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याला समज देऊन सोडून दिले.
याबाबत पवार म्हणाले, की घोणे याने डिजे नाही, तर लाऊड स्पीकर होता. तो सुरू करण्याआधीच मज्जाव करणे कितपत योग्य आहे. त्यांना केवळ जाब विचारला. परंतु, ‘नोकरी खाऊन टाकेन, असा दम मी त्यांना भरल्याचा खोटा आरोप पोलिसांकडून होत आहे. पोलीस केवळ हिंदूच्या सणांच्या आनंद हिरावून घेण्यात पुढे असतात. तेव्हाच त्यांना कारवाई सुचते.
डजेवर कारवाई, मग ढोलताशा पथकामुळेही ध्वनि प्रदूषण होते, त्यांच्या विरोधात कारवाई का केली नाही, असा सवाल पोलिसांकडे केला असता डिजेवरील कारवाईला लोकप्रतिनिधी दमबाजी करून अडथळा आणतात. तर ढोलताशा पथकांच्या विरोधात कशी कारवाई करणार, असा प्रश्न पोलिसांपुढे आहे.