लग्नाचे वऱ्हाड सुट्या पैशांकरिता बँकेच्या रांगेत
By Admin | Updated: November 11, 2016 03:06 IST2016-11-11T03:06:50+5:302016-11-11T03:06:50+5:30
अवघ्या एक दिवसावर मुलाचे लग्न आले आहे. त्याच्या सुटाचे पैसे, लग्नासाठी केलेल्या गाड्या, मंडपवाल्याचे पैसे, मेकअपचे पैसे कसे द्यायचे

लग्नाचे वऱ्हाड सुट्या पैशांकरिता बँकेच्या रांगेत
ठाणे : अवघ्या एक दिवसावर मुलाचे लग्न आले आहे. त्याच्या सुटाचे पैसे, लग्नासाठी केलेल्या गाड्या, मंडपवाल्याचे पैसे, मेकअपचे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न सध्या ठाण्यातील दशरथ साबळे कुटुंबाला पडला आहे. साबळे यांच्या मुलाचे १२ तारखेला पुण्यात लग्न आहे. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच अचानक केंद्र सरकारने ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंद केल्याने गुरुवारी सकाळपासून त्यांचे अख्खे कुटुंबच बँकेबाहेर रांगा लावून माणशी ४ हजार रुपये काढण्यासाठी उभे होते.
ठाण्यातील लोक उपवन येथे दशरथ साबळे कुटुंब वास्तव्यास आहे. मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधून झाला असून साड्या आणि दागिन्यांची खरेदी झाली आहे. लग्न गावाला असल्याने त्यासाठी दोन कार, १६ इन्होवा, दोन बस अशा गाड्यांची व्यवस्था झाली आहे. त्यांना अर्धी रक्कम टोकन देण्यात आली आहे. परंतु, आता केंद्र सरकारने बड्या रकमेच्या नोटांवर बंदी आणल्याने या सर्वांचे पैसे द्यायचे कसे, असा पेच सध्या आमच्या कुटुंबाला सतावू लागला आहे. दारात मंडप घातला आहे. लग्नाच्या मंडपाचा, हॉलचा खर्च भागवण्याकरिता १०० रुपयांच्या किती नोटा व कशा उपलब्ध करायच्या, या विवंचनेत साबळे कुटुंब आहे.
नवऱ्या मुलाचा सूट मुंब्रा येथील टेलरकडे शिवायला टाकला होता. परंतु, त्याने सुट्या पैशांची मागणी केली. अखेरीस त्याला विनंती केल्यावर त्याने सूट दिला. लग्नकार्यात अनेक खर्च असतात. प्रत्येक वेळी सुट्या पैशांची चणचण भासत असेल तर किती लोकांना पैशांकरिता थांबण्याची विनंती करणार, असा सवाल साबळे यांनी केला.