बाप्पासाठी मेणाचा महाल
By Admin | Updated: September 25, 2015 02:11 IST2015-09-25T02:11:22+5:302015-09-25T02:11:22+5:30
कोलबाडच्या राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आगळा वेगळा काल्पनिक आणि पर्यावरणस्नेही मधुज अर्थात मेणाचा महाल साकारला आहे.

बाप्पासाठी मेणाचा महाल
ठाणे : कोलबाडच्या राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आगळा वेगळा काल्पनिक आणि पर्यावरणस्नेही मधुज अर्थात मेणाचा महाल साकारला आहे. तो साकारताना स्थानिक महिलांना मेणबत्त्या कशा बनवाव्या याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे त्यांना भविष्यात लघु उद्योग सुरू करण्याची संधीही मिळणार आहे.
या मेणाच्या मखराची उंची १५ फूट असून लांबी २२ मीटर व रुंदी ३५ मीटर आहे. गणपतीची मूर्ती शाडूची असून ४ फुटाची आहे. ती कळवा येथील मूर्तीकार दीपक गोरे यांनी तयार केली आहे. हा महाल बनवितांना जवळपास ६०० किलो मेण वितळवून त्यात विविध रंग मिसळून आरास केली आहे . ती करताना त्यात शिंपले ,छोटे मोदक- मोठे मोदक , गुलाबाची फुले , जास्वंदीची फुले , विविध रूपातील गणपती यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांची आकर्षक अशी मांडणी केली आहे.
आरास करण्यासाठी एक महिना आधीपासूनच तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले. मंडळाच्या २००-२५० कार्यकर्ते आणि परिसरातील १०० महिलांनी एका महिन्याच्या कालावधीत आरास बनविण्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च केल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. बाप्पाच्या विसर्जनानंतर या सजावटीमध्ये वापरलेल्या मेणबत्याचे आदिवासी पाड्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.
दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण सजावट करणाऱ््या या मंडळाला विविध स्पर्धेत ८० पारितोषिके मिळाली आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विनय राजभर आणि मंडळाचे सल्लागार राजू मोरे यांनी दिली.
त्यामुळे ही आगळी वेगळी आरास बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांची गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)