गावांना पाणी द्या, नाहीतर कार्यालयात बसू देणार नाही
By Admin | Updated: March 23, 2017 01:32 IST2017-03-23T01:32:44+5:302017-03-23T01:32:44+5:30
कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांमधील पाणीटंचाईचा मुद्दा बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत गाजला

गावांना पाणी द्या, नाहीतर कार्यालयात बसू देणार नाही
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांमधील पाणीटंचाईचा मुद्दा बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत गाजला. सभापती रमेश म्हात्रे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना फैलावर घेतले. काहीही करा, पण गावांना पाणी द्या. नुसत्या खुर्च्या उबवू नका. गुरूवारपर्यंत कृती आराखडा सादर झाला पाहिजे; अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही, असा सज्जड दम म्हात्रे यांनी दिला.
स्थायी समितीच्या सभेला सुरूवात होताच म्हात्रे यांनीच सभागृहात गावांमधील पाणीटंचाईचा मुद्दा मांडला. पाणी समस्येवर महापालिका मुख्यालयावर मोर्चे काढण्यात आले. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांत हाणामारीचे प्रसंग घडले यांची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने कोणती ठोस कारवाई केली? असा सवाल त्यांनी कार्यकारी अभियंता पाठक यांना केला. पाणीबिलापोटी ८५ कोटींच्या थकबाकीकडेदेखील संबंधित गावांमधील नगरसेवकांचे त्यांनी लक्ष वेधले. ही थकबाकी भरली जाईल, यासाठी नगरसेवकांनीही प्रयत्न करावे, असे त्यांनी सुचवले. (प्रतिनिधी)