उल्हासनगरमध्ये पाणी पेटणार

By Admin | Published: March 8, 2017 04:16 AM2017-03-08T04:16:43+5:302017-03-08T04:16:43+5:30

पालिका निवडणुकीचा घुरळा खाली बसताच पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. अनियमित पाणापुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून परिस्थितीत

Water in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये पाणी पेटणार

उल्हासनगरमध्ये पाणी पेटणार

googlenewsNext

उल्हासनगर : पालिका निवडणुकीचा घुरळा खाली बसताच पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. अनियमित पाणापुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून परिस्थितीत सुधारणा झाली नाहीतर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अनियमित पाणीपुरवठयामुळे नागरिक कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरु शकतात असा इशारा देणारे पत्र एमआयडीसीला दिले आहे. एमआयडीसीकडून अनिमियत पाणीपुरवठा होत असल्याचे तुणतुणे पालिका सातत्याने वाजवत आहे. एमआयडीसीच्या पाणी तक्त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात दुप्पट पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. मग वाढीव पाणी जाते कुठे? असा सवाल विचारला जात आहे.
मुबलक पाणीपुरवठ्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ३०० कोटीची पाणीवितरण योजना राबविली. पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या दुर्लक्षतेमुळे योजना ठप्प पडली. मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या चौकशीचे आदेश दिले. त्याचे पुढे काय झाले? केवळ कागदीघोडे नाचविण्यात धन्यता मानली जात आहे.
शहरातील कॅम्प नं-४ ओटी सेक्शन, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, दहाचाळ, तानाजीनगर, समातानगर, करोतियानगर, डॉल्फिन हॉटेलसह संपूर्ण शहरामध्ये पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. या भागात आठवड्यातून तीन ते चार दिवस अनियमित व अर्धा तास पाणीपुरवठा होतो. याबाबत आयुक्तांकडे तक्रारींचा पाऊस पडला असून अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पाणीसमस्या सोडविणार असल्याचे सांगितले. यापूर्वी ज्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली त्याची थेट चौकशी करून समस्या सोडविली जात होती. त्यामुळे नागरिकांचे समाधान होऊन कमीतकमी पिण्यासाठी त्यांना पाणी मिळत होते. आता मात्र तसे होताना दिसत नसल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ज्या परिसरातील नागरिकांनी ५० टक्यापेक्षा कमी मालमत्ता कर भरला त्यांना सुविधा देणार नाही अशी भूमिका निंबाळकर यांनी गेल्यावर्षी घेतली होती. तसेच थकित मालमत्ता कर वसुलीसाठी थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर किन्नरांचा बँडबाजा वाजविणार असा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मग पिण्याचे पाणी न देणाऱ्या पालिकेसमोर किन्नरांना का
नाचवू नये? असा प्रश्न गेल्यावर्षी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशांत यांनी आयुक्तांना विचारून खळबळ उडून दिली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)

निंबाळकर हे तुकाराम मुंढेंच्या मार्गावर
- महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर कचरामुक्त केले. तसेच थकित मालमत्ता कर वसुलीसह इतर निर्णय अचूक घेतल्याने नागरिक त्यांच्या पाठिशी उभे राहिले.
- कालांतराने नगरसेवकांसह नागरिक, समाजसेवक यांच्या तक्रारी ऐकायला त्यांना वेळ नसल्याचा आरोप होत आहे. असेच राहिल्यास नवी मुंबई प्रमाणे आयुक्तांविरोधात ठराव आणावा लागेल, अशी पुस्ती बहुतांश नगरसेवकांनी जोडली.

दिवसाला १२० टँकरच्या फेऱ्या : गेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे शहरात दिवसाला १६० च्या आसपास टँकरच्या फेऱ्या होत होत्या. सध्या टंचाईग्रस्त भागात १०० ते १२० फेऱ्या होत आहेत. शहरातील ७० टक्के हातपंप सुरु आहेत. तेथूनच नागरिक घेऊन जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणी
एमआयडीसीकडून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. झोपडपट्टी भागात आठवडयातून दोन ते तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा तर गर्भश्रीमंत परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. गेल्यावर्षी टंचाईच्यावेळी निळया पाईपला तोटया नसल्याने लाखो लिटर पाणी गटारत जात असल्याचे आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाले असून अद्यापही तोटया बसविल्या नसल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Water in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.