उल्हासनगरमध्ये चार दिवस पाणी बंद

By Admin | Updated: February 22, 2016 00:40 IST2016-02-22T00:40:03+5:302016-02-22T00:40:03+5:30

एमआयडीसीच्या अनियमित पाणीपुरवठ्याचा फटका उल्हासनगरला बसला असून चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने अक्षरश: हाहाकार उडाला. कसाबसा चौथ्या दिवशी दुपारनंतर

Water in Ulhasnagar for four days | उल्हासनगरमध्ये चार दिवस पाणी बंद

उल्हासनगरमध्ये चार दिवस पाणी बंद

उल्हासनगर : एमआयडीसीच्या अनियमित पाणीपुरवठ्याचा फटका उल्हासनगरला बसला असून चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने अक्षरश: हाहाकार उडाला. कसाबसा चौथ्या दिवशी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला, पण तोही कमी दाबाने असल्याने पाण्यासाठीची महिलांची वणवण थांबलेली नाही. एरव्ही, आरोग्यास घातक असलेले हातपंप आणि विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रात्रभर शेकडो नागरिकांनी जलकुंभांवर ठाण मांडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
उल्हासनगरच्या पूर्व भागाला पाले आणि जांभूळ गावातील जलकुंभातून, तर पश्चिमेला शहाड-टेमघर येथून पाणीपुरवठा होतो. पूर्व भागातील पुरवठा सलग गुरुवार, शुक्रवारी, तर पश्चिमेचा मंगळवार, शुक्रवारी बंद ठेवला जातो.
एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे कारण एमआयडीसीने दिले. रविवारी दुपारनंतर पाणीपुरवठा कसाबसा सुरू झाला. मात्र, कमी दाबाने पुरवठा होत असल्याने पाणीप्रश्न पूर्ण सुटलेला नाही. तीन दिवस पाणी नसल्याने पिण्यासाठी हातपंप आणि विहिरींतून पाणी उपसण्याची वेळ आली.
शहरातील हातपंप व विहिरींचे पाणी आरोग्याला घातक असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. पिण्याऐवजी भांडी आणि कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करावा, असे सुचवले होते. मात्र, सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी तेही पाणी पिण्यासाठी वापरले. एमआयडीसीच्या लहरीपणाचा धसका पालिकेने घेतला असून सध्याच्या स्थितीत नागरिक मागणी करतील, त्या ठिकाणी बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे.

पाण्यासाठी रात्रभर जागरण
सलग तीन दिवस पाणी न आल्याने शनिवारी पिण्यासाठी तरी पाणी येईल, या आशेपोटी नागरिकांनी नळांसमोर रात्र जागून काढली. शेकडो नागरिकांसह नगरसेवकांनी जलकुंभावर ठाण मांडून रात्रभर पाण्याची प्रतीक्षा केली. महिलांना पिण्याच्या पाण्याच्या एका हंड्यासाठी पायपीट करावी लागली.

हातपंप, विहिरी वरदान
शहरात सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. झोपडपट्ट्यांत पाणी साठवण्यासाठी पुरेशी भांडी नसल्याने त्यांचे सर्वाधिक हाल झाले. पाणीप्रश्न इतका तीव्र होता की, चार-पाच वर्षांची मुले पाणी भरण्यासाठी आईवडिलांनी मदत करत असल्याचे चित्र होते.

मुंब्रा-कळव्यासह ठाणेकरांना दिलासा
डोंबिवली एमआयडीसीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना शनिवारी रात्री अचानकपणे तेथे शॉर्टसर्किट होऊन जलवाहिनी फुटली. हजारो लीटर पाणी वाया गेले. ते खिडकाळी भागातील आसपासच्या शेतीसह काही घरांमध्ये घुसल्याने गोंधळ उडाला. यात दोन झोपड्या वाहून गेल्याचे वृत्त आहे. रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडल्याने एकाच वेळी शॉर्टसर्किटमुळे वीजवाहिनीची दुरुस्ती, जलवाहिनीची दुरुस्ती हाती घ्यावी लागली. शिवाय, अंधारामुळे मदतकार्यासह दुरुस्तीतही अनेक अडथळे निर्माण झाले.
१८७२ एमएम व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम एमआयडीसीने शुक्रवारपासून सुरू केले होते. ती शनिवारी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठ्याला फटका बसण्याची चिन्हे लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रविवारी पहाटे ४ पर्यंत ते काम सुरू होते. दुरुस्तीच्या कामानंतर चाचणी घेण्यात आली आणि खात्री झाल्यावर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
त्यामुळे डोंबिवलीसह कळवा, मुंब्रा, ठाण्याच्या काही भागाला कोणत्याही प्रकारे पाण्याची समस्या उद्भवू दिली नाही, असा विश्वास डोंबिवली एमआयडीसीचे अभियंता शंकर जगताप यांनी व्यक्त केला. त्या जलवाहिनीतून २४ तास पाणीपुरवठा होतो. मात्र, दुरुस्ती झाल्याने कोणत्याही भागातील एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Water in Ulhasnagar for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.