डोंबिवली-बदलापूरमध्ये प्रदूषण वाढल्याने जलस्रोत होतात दूषित
By Admin | Updated: November 15, 2016 04:37 IST2016-11-15T04:37:01+5:302016-11-15T04:37:01+5:30
रासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका

डोंबिवली-बदलापूरमध्ये प्रदूषण वाढल्याने जलस्रोत होतात दूषित
मुरलीधर भवार / डोंबिवली
रासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. जून २०१६ मध्ये प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी ‘वनशक्ती’ने डोंबिवली व बदलापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचे नमुने घेतले असता त्यात प्रदूषणाची मात्रा वाढल्याचे आढळले. कारखानदार व सांडपाणी प्रक्रिया केंद्रे धूळफेक करणारी माहिती देत आहेत. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप करत ‘वनशक्ती’ने ही माहिती लवादाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी थेट कल्याण खाडी, उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. हे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी ‘वनशक्ती’ने नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. ‘वनशक्ती’ने सांडपाण्याचे नमुने गोळा केले. त्यात प्रदूषण होत आहे, अशी बाब त्यांनी याचिकेद्वारे लवादाकडे मांडली. ती सध्या न्यायप्रविष्ट आहे. लवादाने वारंवार महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच सोयीसुविधा न पुरवणाऱ्या एमआयडीसीसही वारंवार विचारणा केली आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा मुद्दा वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीने लवादासमोर मांडला आहे. तसेच प्रदूषणासंदर्भात प्रतिज्ञापत्रही लवादाकडे सादर केले आहे. लवादाने कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे आदेश एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहे.
लवादाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र डोंबिवली, अंबरनाथ, औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका यांना एकत्रित असा १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याविरोधात कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली आहे. काही महापालिकांनी दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. दंडाच्या रकमेतून उल्हास नदी, कल्याण खाडी व वालधुनी नदीत होणारे प्रदूषण दूर करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे सूचित केले होते. लवादाने केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह सगळ्यांना धारेवर धरल्यावर मंडळाने अंबरनाथ व डोंबिवलीतील एकूण १४४ रासायनिक कारखाने बंद केले. ही नोटीस २ जुलैपासून लागू आहे. त्यावरील स्थगिती लवादाने अद्याप उठवलेली नाही.
डोंबिवली फेज टू मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहे. तर, अंबरनाथमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तीन महिन्यांसाठी २५ टक्के चालवण्यास मुभा दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जून २०१६ मध्ये डोंबिवली फेज एकमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पाण्याची प्रदूषणाची मात्रा आटोक्यात आल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. तसेच डोंबिवली फेज दोनमधील सांडपाण्यातील प्रदूषणाची मात्रा कमी झालेली नाही.