उल्हासनगरात पाणीटंचाई पुन्हा उडणार हाहाकार?

By Admin | Updated: March 21, 2017 01:40 IST2017-03-21T01:40:09+5:302017-03-21T01:40:09+5:30

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी

Water shortage in Ulhasanagar will blow again? | उल्हासनगरात पाणीटंचाई पुन्हा उडणार हाहाकार?

उल्हासनगरात पाणीटंचाई पुन्हा उडणार हाहाकार?

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी गुरुवारी एक मीटरने खाली गेल्यावर, एमआयडीसीने पम्पिंग स्टेशनमधील मशीनमध्ये कचरा शिरू नये, म्हणून काही काळ पाणीउपसा बंद केला होता. यामुळे दोन दिवस पश्चिमेत पाणीटंचाई निर्माण झाली. असा प्रसंग पुन्हा ओढवू नये म्हणून, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाला नदीत वेळीच पाणी सोडण्याची विनंती केली.
महापालिकेकडे स्वत:ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे पाण्यासाठी पूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. याचा फायदा एमआयडीसी अधिकारी घेत आहेत. पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर येताच ते थकीत पाणीबिलाचे कारण पुढे करतात. शहराला अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करत आहेत. शहराला दररोज १२० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून त्याचे बिल एमआयडीसी महापालिकेला पाठवत आहे. इतके पाणी मिळूनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे पाणी जाते कुठे, असा प्रश्न महापालिका व नागरिकांना पडत आहे. शहरातील पाणीवितरण व्यवस्था ५० वर्षे जुनी आहे. पाणीगळतीचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. ३०० कोटींची पाणीवितरण योजना सात वर्षांपासून राबवली आहे. मात्र, काही कारणास्तव योजना रखडल्याने पाणीसमस्या कायम आहे.
एमआयडीसीच्या पाले व जांभूळ जलसाठ्यातून शहराच्या पूर्वेला ३७, तर शहाड गावठाण जलसाठ्यातून पश्चिमेला ८५ ते ९० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहत असल्याने त्याचा परिणाम पुढील दोन दिवस पाणीवितरणावर होतो. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवस पाणी नागरिकांना मिळत आहे. मात्र, तेही अपुरे असल्याने नागरिकांत असंतोष आहे. आयुक्त निंबाळकर यांनी एमआयडीसीला पत्र पाठवून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या प्रकाराला जबाबदार धरण्याचा इशाराही दिला आहे.
-सदानंद नाईक, उल्हासनगर

Web Title: Water shortage in Ulhasanagar will blow again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.