भिवंडीच्या मध्यवर्ती भागात पाणीटंचाई
By Admin | Updated: August 12, 2015 23:17 IST2015-08-12T23:17:14+5:302015-08-12T23:17:14+5:30
शहरातील मध्यवर्ती भागात काही दिवसांपासून कधी पाणीटंचाई तर कधी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरांतील नागरिकांनी महानगरपालिका कार्यालयावर आज दुपारी धडक दिली.

भिवंडीच्या मध्यवर्ती भागात पाणीटंचाई
- महिलांची पालिका कार्यालयास धडक
भिवंडी : शहरातील मध्यवर्ती भागात काही दिवसांपासून कधी पाणीटंचाई तर कधी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरांतील नागरिकांनी महानगरपालिका कार्यालयावर आज दुपारी धडक दिली.
शहरात रात्रंदिवस पाऊस सुरू असताना खडकरोड, नझराना कंपाऊंड परिसरांत काही दिवसांपासून पिण्याचे पाणी नियमीत पुरविले जात नाही. त्या ऐवजी टँकरने पाणी पुरविले जाते. टँकरचे पाणी देखील गढूळ पुरविल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी थेट पालिका कार्यालयात धाव घेतली. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. पालिकेचे अधिकारी जलवाहिनी दुरूस्त न करता अर्थिक स्वार्थापोटी टँकरने पाणीपुरवठा करतात, असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. अडीच वर्षापासून या परिसरांत पहाटे ३-३० वाजता पाणीपुरवठा केला जातो. त्यामधूनही बऱ्याचवेळा गढूळ पाणी येते. या बाबत वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही. त्यामुळे या परिसरांतील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. पालिका आयुक्तांना नागरिकांनी लेखी निवेदन देऊन नियमीत व वेळेवर पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. (प्रतिनीधी)
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत शांततेचा काळ असल्याने त्यावेळी पाणीपुरवठा केला जाऊ नये असे असताना पालिका अधिकारी काही ना काही कारणे दाखवित या वेळेदरम्यान पाणीपुरवठा करीत असते.