शार्लेट तलावात पाण्याचे पुनर्भरण
By Admin | Updated: October 31, 2015 00:08 IST2015-10-31T00:08:01+5:302015-10-31T00:08:01+5:30
माथेरान या पर्यटनस्थळी स्थानिक आणि पर्यटकांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या शार्लेट तलावामधून (लेक)मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असते

शार्लेट तलावात पाण्याचे पुनर्भरण
कर्जत : माथेरान या पर्यटनस्थळी स्थानिक आणि पर्यटकांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या शार्लेट तलावामधून (लेक)मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असते. गळती झालेले पाणी खालच्या भागात साठविले जाते. त्यानंतर ते पाणी पुन्हा उचलून तलावात सोडले जाते. ही योजना माथेरानमध्ये शंभर टक्के यशस्वी झाली आहे. असा प्रयोग करून माथेरानमध्ये जीवन प्राधिकरणाने पाण्याचा थेंबदेखील वाया जाणार नाही याची काळजी घेण्याचे काम सुरू आहे.
ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी वसविलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी तेथे राहणाऱ्या लोकांना मिळावे यासाठी काही धरणे बांधली. माथेरानला येणारे पर्यटक आणि स्थानिक लोक यांना सर्वाधिक पाणीपुरवठा ज्या शार्लेट तलावामधून होतो त्या तलावाच्या मुख्य बांधातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. माथेरानमध्ये ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. अशा वेळी गळती होऊन खाली गेलेले पाणी वाया जाऊ नये म्हणून माथेरानच्या शार्लेट तलावाची जबाबदारी असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशेष काम तेथे करीत असते. सतत होणाऱ्या पाणी गळतीमुळे जरी शार्लेट लेक तलावास धोका निर्माण होत आहे. तलावातील पाणी अधिकाधिक लोकांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून जीवन प्राधिकरण तलावातून गळती झालेले पाणी खालच्या भागात साठविण्याचे काम करीत असते.
तेथे एक विहीर बांधली असून विहिरीत साठून राहिलेले पाणी पुन्हा जलवाहिनीमधून पुन्हा तलावात पंपाने टाकले जाते. त्यासाठी गळती झालेले पाणी पुन्हा साठवून ठेवले जाते, त्या विहिरीजवळ पंप हाऊस देखील उभारण्यात आला आहे. या अभिनव योजनेमुळे माथेरानला पाणीपुरवठा करणारा शार्लेट लेकमधून जरी पाण्याची गळती सुरू असली तरी ते पाणी खाली दरीमध्ये जाऊ नये याची काळजी जीवन प्राधिकरण घेत आहे. ज्यावेळी तलावातून गळती झालेले पाणी विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात साचले जाते, त्यानंतर पंप सुरू करून ते पुन्हा तलावात आणले जाते, असे शाखा अभियंता भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)