पाणीप्रश्न गाजलाच!
By Admin | Updated: April 21, 2017 00:15 IST2017-04-21T00:15:15+5:302017-04-21T00:15:15+5:30
महापालिकेच्या गुरूवारच्या पहिल्याच महासभेत शहरातील पाणीप्रश्न गाजला. शिवसेनेने याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले.

पाणीप्रश्न गाजलाच!
उल्हासनगर : महापालिकेच्या गुरूवारच्या पहिल्याच महासभेत शहरातील पाणीप्रश्न गाजला. शिवसेनेने याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. तसेच महापौरांनी मान्यता दिलेली लक्षवेधी सूचना बदलण्यास भाग पाडल्याने सत्ता भाजपाची आणि आवाज शिवसेनेचा असे चित्र महासभेत होते. भाजपाचे नगरसेवक राजेश वानखडे यांनी सेना नगरसेवकांसोबत बसून भाजपाला लक्ष्य केल्याने पक्षातील बेबनाव सभागृहात उघड झाला.
उल्हासनगर महापालिकेची महासभा पाणीप्रश्नी वादळी ठरेल, असे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच शिवसेनेने फक्त पाणीप्रश्नी चर्चा करा, असे महापौरांना सुचविले. महापौर मीना आयलानी यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्यास सचिव प्रतिभा कुलकर्णी यांना सांगितले. शिवसेनेचे गटनेते रमेश चव्हाण, राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, धनंजय बोडारे, नगरसेविका वसुधा बोडारे, रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव, पीआरपीचे नगरसेवक प्रमोद टाले, शिवसेना नगरसेवकासोबत बसलेले भाजपाचे नगरसेवक राजेश वानखडे, राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, काँॅग्रेसच्या अंजली साळवे यांनी एकच गोंधळ घालण्यास सुरूवात करून ठिय्या आंदोनल केले.
महापौरांनी आक्रमक शिवसेना सदस्यांची समजूत काढत पाणीप्रश्नावर प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करू असे वारंवार सांगत होत्या. त्यावेळी त्यांनी गोंधळातच लक्षवेधी सूचना पालिका सचिवांना वाचण्यास सांगितले. त्यावर विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. महापौरांनी स्वीकारलेली लक्षवेधी नियमानुसार आहे का? असा प्रश्न सचिवांना केला आणि मग शिवसेनेची पाणीप्रश्नी लक्षवेधी का स्वीकारली नाही, यावरून महापौरांना धारेवर धरत कोंडी केली. नगरसेवक सुर्वे यांनी तर महापौरांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, असे सांगितले. सत्ताधाऱ्यांकडून सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी किल्ला लढवित होते. अखेर महापौरांनी स्वीकृत केलेल्या लक्षवेधी सूचना रद्द करून विरोधी पक्षातील काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांची वालधुनी नदी प्रदूषण व राष्ट्रवादीचे नगरसेवक सतरामदास जेसवानी यांची शहरविकास कामाची लक्षवेधी स्वीकारली.
मनपावर भाजपाची सत्ता असताना आक्रमक शिवसेना, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी, आरपीआय नगरसेवकांसमोर कोणताच सत्ताधारी नगरसेवक बोलण्यास धजावला नाही.
भाजप नगरसेवक वानखडे यांनी विरोधी नगरसेवकांसोबत आघाडी उघडली होती. वालधुनी नदी प्रदूषण, शहरातील मूलभूत विकासकामांच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांची तोंडओळख करून देण्यात आली. यावेळी काही नगरसेवक अधिकाऱ्यांची टर उडवित असल्याचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या लक्षात आल्यावर त्यांना समजही दिली. (प्रतिनिधी)
शहरहितासाठी विरोधी बाकावर
शहरहितासाठी शिवसेना विरोधात बसली आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेऊन शहर विकास घडवून आणण्याचे काम शिवसेना करणार आहे, अशी प्रतिक्रीया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. कोणतीही मान्यता न घेता सत्ताधाऱ्यांनी पाच पालिकेतील दालनांच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तोडफोड केली. शिवसेनेचे आवाज उठविल्यावर आयुक्तांनी दखल घेत नूतनीकरणाचे काम बंद केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.