एमआयडीसीकडून पाण्याचा दाब वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST2021-02-26T04:55:59+5:302021-02-26T04:55:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने भोपर, सांगाव, नांदिवली, सांगर्ली आदी भागांत पाणीटंचाई भेडसावत ...

एमआयडीसीकडून पाण्याचा दाब वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने भोपर, सांगाव, नांदिवली, सांगर्ली आदी भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यासंदर्भात केडीएमसीने एमआयडीसीला पत्र दिले होते. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना फोनद्वारे पाणीसमस्या सोडवून नागरिकांचे हाल थांबवा, अशी सूचना केली. त्यानंतर लगेचच त्या भागांतील पाण्याचा दाब वाढल्याची माहिती भोपरमधील रहिवाशांनी दिली.
डोंबिवलीनजीकच्या गावांना पाणीसमस्या भेडसावत असल्याचे शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे आणि भाजपचे अमर माळी यांनी डॉ. शिंदे यांना सांगितले. त्यावर त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटा त्यांच्याशी बोलतो, असे सांगितले. त्यानुसार कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. उन्हाळा सुरू होत असून नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी पाणी समान आणि चांगल्या दाबाने वितरित करण्याची सूचना डॉ. शिंदे यांनी दिली.
त्यानुसार काही वेळेतच भोपर भागात पाणी महिनाभरापेक्षा चांगल्या दाबाने गुरुवारी वितरित झाल्याचे माळी यांनी सांगितले. त्यामुळे अचानक पाण्याचा दाब कसा वाढला, त्याबाबत ननावरे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की,‘काही दिवस पंपिंग संदर्भात तांत्रिक काम सुरू होते. त्यामुळे कमी अधिक दाबाने पाणी वितरित झाले असेल. महापालिकेचे पाणी समस्येबाबत पत्र आले होते. तसेच डॉ. शिंदे यांचाही फोन आला होता. एमआयडीसीला भेडसावणाऱ्या अडचणी, तांत्रिक कामे याबाबत त्यांनाही माहिती दिली. तसेच संबंधित विभाग अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानुसार पाणी वितरणात सुधारणा झाली आहे.’
‘सातत्य राखणे गरजेचे’
डॉ. शिंदे म्हणाले की, काही दिवसांपासून काही गावांमध्ये पाणी समस्या भेडसावत असल्याचे कळले. त्यामुळे त्यासंदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांना गुरुवारी सूचना दिल्या आहेत. पाणी समस्या तत्काळ सुटावी, याबाबत चर्चा झाली. सुधारणा झाली असेल तर चांगलेच आहे, पण त्यात एमआयडीसीने सातत्य राखणे गरजेचे आहे.
---------