नोटांसोबत आता पाणीही बंद!
By Admin | Updated: November 16, 2016 04:33 IST2016-11-16T04:33:36+5:302016-11-16T04:33:36+5:30
एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने

नोटांसोबत आता पाणीही बंद!
ठाणे/कल्याण : एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने आठवडाभर आधीच पाणीकपात लागू करून नागरिकांच्या तोंडचे उरलेसुरले पाणीही पळवले. इतर पालिकांत अवघी सात टक्के कपात लागू असल्याने महिन्यातून अवघे दोन दिवस पाणी बंद राहणार असताना कल्याण-डोंबिवलीत मात्र चार दिवस पाणीकपात लागू राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरूही झाली.
वस्तुत: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना इतक्या लवकर पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र अनेक महापालिका त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याने पाटबंधारे विभागाने सात टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले. ही कपात पालिकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्याला सात टक्के या प्रमाणे चार दिवस किंवा महिन्यातूनव दोन दिवस लागू करायची होती. ठाणे पालिकेने पुढील आठवड्यापासून महिन्यातून दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. उल्हासनगर पालिकेत अवैध जोडण्यांमुळे सध्या टंचाई लागू असल्याने तेथे कपातीचा निर्णय झालेला नाही. मीरा-भाईंदर, भिवंडी पालिकांनी अद्या निर्णय घेतलेला नाही, तर कल्याण-डोंबिवली पालिकेने महिन्ेयातून चार दिवस म्हणजे १५ टक्के कपात लागू करून आठवडाभर अगोदर त्याची अंमलबजावणीही सुरू केली. यंदा पाऊस चांगला झाल्याने फारशी कपात करावी लागणार नाही, असे पालिकेचेच अधिकारी सांगत असताना ही कपात लागू झाली आहे.
मनपाला उपलब्ध कोट्यानुसारच पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने लागू केला असून त्यानुसारच शहराचा पाणीपुरवठा दर मंगळवारी, तर ग्रामीण भागाचा दर शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. ठाणे जिल्ह्याातील महापालिकांना १५ नोव्हेंबरपासून पाणीकपातीची सक्ती लघुपाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र कपातीचे वेळापत्रक अद्यापही तयार न झाल्यामुळे इतर महापालिकांत पुढील आठवड्यापासून पाणीकपातीची अंमलबजावणी होणार आहे.
लघुपाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार केडीएमसीने मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीकडून २७ गावांना पाणीपुरवठा होत असल्याने त्यांचा पुरवठा शुक्रवारी बंद राहील, असे जाहीर केले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरावा, यासाठी ही कपात लागू केल्याचे केडीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)