पाणीकपात वाढणार
By Admin | Updated: February 24, 2016 03:09 IST2016-02-24T03:09:49+5:302016-02-24T03:09:49+5:30
उल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत.

पाणीकपात वाढणार
- मुरलीधर भवार, कल्याण
उल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, सध्या लागू असलेली ४० टक्के पाणीकपात आणखी २५ टक्क्यांनी वाढवून ६५ टक्के करण्याचे तोंडी आदेश लघू पाटबंधारे विभागाने दिले आहेत. तसे झाल्यास याच पाण्यावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या उल्हासनगर, मीरा-भाईंदरसारख्या महापालिका, २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सध्याप्रमाणे दोन दिवस पाणी बंद आणि उरलेल्या दिवसांत रोज निम्मी पाणीकपात किंवा एक दिवासआड पाणी आणि उरलेले दिवस कमी दाबाने पुरवठा अशी पाणीबाणी निर्माण झाली आहे.
सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळे एमआयडीसी त्यांच्या पाणीग्राहकांना- त्या त्या पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन दिवस पाणी पुरवत नाही. नंतरही एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी घरगुती ग्राहक त्रासलेले असतानाच उद्योगही अडचणीत आले आहेत.
उल्हासनगर महापालिका पूर्णपणे एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाच नाही. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांनाही एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. त्यांना ३० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरविले जाते. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळेच या भागात परिस्थिती बिकट झाली आहे. एमआयडीसीच्या पाण्यावर मीरा-भाईंदर महापालिकेसह दिवा, मुंब्रा, कळवा या परिसरातील ग्राहक अवलंबून आहेत. सध्याची ही पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेली, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. ४० टक्के कपातीमुळे एमआयडीसीकडून आठवड्यातून केवळ साडेचार दिवस पाणीपुरवठा होतो.
हॉटेलांना फटका, कामगारांवर उपासमारीची वेळ
एमआयडीसीचा 80%
पाणीपुरवठा घरगुती आहे आणि उरलेला औद्योगिक म्हणजेच उद्योग, कारखान्यांना होतो. 3500कारखान्यांत ही
65%
पाणीकपात लागू झाली, तर निम्मा आठवडा कारखाने बंद टेवण्याची वेळ येणार आहे.
टँकरने पुरेसे पाणी मिळाले नाही, तर हॉटेलही बंद ठेवावी लागतील. त्याचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम होईल. उत्पादन घटेल. या कारखान्यांत साधारण लाखांवर कामगार काम करता. त्यांना टंचाईच्या काळात अकारण सुट्टी मिळेल आणि तेवढा पगार कमी झाल्याने त्यांच्या, कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उपासमारीची वेळ येऊ शकते.
दोन-तीन दिवसांत अंमलबजावणी?
लघू पाटबंधारे खात्याने एमआयडीसीला वाढीव पाणी कपातीचे सध्या दिलेले आदेश तोंडी असल्याने लेखी आदेशाशिवाय ही २५ टक्के वाढीव पाणीकपात लागू करणार नाही; तिची अंमलबजावणी सुरु करणार नाही, असा पावित्रा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
पण त्यामुले फार फरक पडणार नाही. २५ टक्के जादा पाणीकपातीची अंमलबजावणी तूर्त केवळ एक-दोन दिवस पुढे जाऊ शकते.
लघू पाटबंधारे खात्याने या काळात लेखी स्वरुपात एमआयडीसीला आदेश दिले, तर वाढीव २५ टक्के कपात येत्या आठवड्यातच लागू होण्याची चिन्हे आहेत.