भातसा धरणाच्या पाणीपातळीत तीन मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST2021-07-20T04:27:43+5:302021-07-20T04:27:43+5:30

शेणवा : मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी ...

Water level of Bhatsa dam increased by three meters | भातसा धरणाच्या पाणीपातळीत तीन मीटरने वाढ

भातसा धरणाच्या पाणीपातळीत तीन मीटरने वाढ

शेणवा : मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी रात्रीत तीन मीटरने वाढली आहे. चोवीस तासांत धरण क्षेत्रात ९०९.०० मिलीमीटर पाऊस झाला असून, साेमवारी धरण क्षेत्रात २०१.०० मिमी इतका पाऊस झाल्याने १९ जुलैला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, ११८.५० इतकी पाणीपातळी झाली आहे. पाणीपातळी तीन मीटरने वाढल्याने धरणात एकूण पाणीसाठा ४५६.३८४ दलघमी झाला असून, साेमवारपर्यंत धरणात ४४.८३ टक्के पाणी साठा झाला आहे.

पावसाने दडी मारल्याने पुरेशा पर्जन्याअभावी १८ जुलैपर्यंत धरणात ४० टक्के पाणी म्हणजे ११५.४५ मीटर पाणीपातळी होती. मुंबईला सर्वात जास्त पाणी पुरवठा करणारे धरण म्हणून भातसा जलाशयाची ओळख आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणांतून प्रतिदिन तीन हजार ९०० एमएलडी इतके पाणी मुंबई व ठाणे शहरांना पुरविले जाते. यात सर्वाधिक प्रतिदिन जवळपास २२०० एमएलडी पाणी मुंबई व ठाणे महानगराला पुरविण्याची जबाबदारी भातसा जलाशयावर आहे. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून, तळपायापासून उंची ८९ मीटर आहे, तसेच एकूण जलसंचय ९७६.१० दशलक्ष घनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमीटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमीटर आहे.

Web Title: Water level of Bhatsa dam increased by three meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.