ग्रामीण भागांत आजपासून अडीच दिवसांची पाणीकपात
By Admin | Updated: February 17, 2016 02:04 IST2016-02-17T02:04:04+5:302016-02-17T02:04:04+5:30
ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी

ग्रामीण भागांत आजपासून अडीच दिवसांची पाणीकपात
कल्याण : ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी ६ अशी अडीच दिवसांची (६० तासांची) पाणीकपात लागू केली जाणार असल्याची माहीती एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी दिली.
उपलब्ध असलेल्या पाणीसाठयाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस ठाणे जिल्हयात पाणीबाणी लागू केली होती. परंतु, सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवूनही उर्वरीत दिवशीही कल्याण डोंबिवलीत पाण्याची बोंबाबोंब कायम राहिल्याने ही पाणीकपात रद्द करावी लागली होती.
यानंतर पूर्वीचे जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात मंगळवार आणि शनिवार या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल याअनुषंगाने या आठवडयापासून एमआयडीसीने ६० तासांची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बारवीमध्ये ९० आणि आंद्रा धरणात ६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो केवळ १०५ दिवस पुरेल इतकाच असल्याने हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसह ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, मिरा-भार्इंदर आदी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.