पाणी आले... पण वीज गेली
By Admin | Updated: July 12, 2016 02:36 IST2016-07-12T02:36:18+5:302016-07-12T02:36:18+5:30
मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत.

पाणी आले... पण वीज गेली
ठाणे : मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत.
घोडबंदर परिसर, नौपाडा, कोपरी, दिवा, मुंब्रा आदींसह इतर भागांतही विजेचा लहरी कारभार सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे सांगितली जात असली तरी खरी कारणे काय, याचे उत्तर मात्र महावितरणकडे नाही. घोडबंदर भागातील मानपाडा, शिवाजीनगर, मनोरमानगर, गणेशनगर आदी भागांत दिवसातून १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांत अंडरग्राउंड वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, तर घोडबंदरच्या काही भागांमध्ये आजही ओव्हरहेड वीजपुरवठा सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्यामागे जोरदार पाऊस हेच कारण असल्याचा सूर महावितरण लावत आहे. ओव्हरहेड लाइनच्या ठिकाणी कार्बन पकडणे, कंडक्टर डॅमेज होणे आदींसह इतर ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या ठाणे विभागात रोज १५० च्या आसपास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येतात.परंतु, एका तक्रारीवर काम करीत असताना पुन्हा दुसरी तक्रार, अशा तक्रारी वाढतच असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी मान्य केले.
गेले दोन दिवस डोंबिवली, कल्याणमधील अनेक भागांत दोन-चार तास वीज गायब आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण आहेत.
गेल्याच आठवड्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी महावितरणच्या विविध तक्रारींबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही.
शिंदेंनी कल्याणमध्येही बैठक घेतली होती. त्याचे काय झाले आणि शिवसेना कधीपासून बैठका-चर्चा करायला लागली, असा संतप्त सवालही त्रस्त नागरिकांनी विचारला.
... तरीही पाण्याची बोंब आहेच
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्या असून त्यांना पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईचे संकट दूर झाले, तरी वीज नसल्याने सोसायट्यांच्या टाकीत मुबलक पाणी असूनही ते रहिवाशांना देता येत नाही. त्यामुळे अस्मानी संकटातून सुटलेले महावितरणच्या सुलतानी पाणीसंकटाचे बळी ठरले आहेत.