शिवसेनेच्या नगरसेवकांवर तीन पथके ठेवणार वॉच
By Admin | Updated: May 27, 2016 04:19 IST2016-05-27T04:19:50+5:302016-05-27T04:19:50+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना रवींद्र फाटक यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने खास व्यूहरचना आखली आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांवर तीन पथके ठेवणार वॉच
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना रवींद्र फाटक यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने खास व्यूहरचना आखली आहे. तिचा एक भाग म्हणून पक्षातील अथवा मित्र पक्षातील एकही मत फुटले, तरी त्याची माहिती पक्षाने तयार केलेल्या खास टीमला तत्काळ कळणार आहे. तसेच पक्षातील एकही मत फुटू नये, यासाठीदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: लक्ष घालून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपामधील खासदार, आमदार आणि नगरसेवकही कामाला लागले आहेत. विविध ठिकाणी मेळावे घेणे, प्रत्येक नगरसेवकाला भेटणे आदींसह रात्रीच्या निनावी स्थळी बैठका घेण्याचे कामही सुरू आहे.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक असा सामना रंगतदार स्थितीत आला आहे. आता प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाल्याने आपल्या पक्षातील मतांसोबतच इतर पक्षांतील मते आपल्याकडे कशी वळवता येतील, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी दोन्ही पक्षांकडून सुरू झाली आहे. त्यातही बविआने डावखरे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेची सर्वच नेते मंडळी मताधिक्य वाढवण्यासाठी व्यूहरचना आखत आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या पक्षातील एकही मत फुटू नये, यासाठी शिवसेनेतील काही नगरसेवक, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी टीम तयार केली असून ती याकडे लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील आपल्या पक्षातील प्रत्येक नगरसेवकाच्या हालचाली टिपण्याचे काम त्यांच्याकडून सध्या सुरू आहे. तर, दुसऱ्या पक्षातील काही नगरसेवक खेचण्यासाठीदेखील दुसऱ्या एका विशिष्ट टीमचे गठण केले आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या दिवशीदेखील पक्षातील एखादे जरी मत फुटले, तरी त्याची माहिती तत्काळ शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेबरोबरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालावरच भविष्यातील विधान परिषदेच्या इतर जागांची आणि महापालिका निवडणुकांची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे तिला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वसंत डावखरे आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यातील चुरस वाढलेली आहे. दरम्यान, शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपानेही मित्रधर्म गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हाच संदेश जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या नगरसेवकांपर्यंत जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात येणार आहेत. येत्या २८ मे रोजी दुपारी ४ वाजता ते ठाण्यात मेळावा घेणार आहेत. मात्र, तो कुठे असेल, हे मात्र अद्यापही निश्चित झालेले नाही. परंतु, वागळे इस्टेट येथील एखाद्या सभागृहात ही बैठक घेतली जाईल, असे मानले जात आहे. ते मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. भाजपा खासदार कपिल पाटील यांनीदेखील या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत.