जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर पाेलिसांनी ‘आपले ठाणे सुरक्षित ठाणे’ हे ॲप खास पाेलिसांसाठी विकसित केले आहे. त्यामुळे गर्दीच्या आणि ओसाड जागी प्रभावी गस्त घातली जात असल्याने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात काही अंशी तरी यश आल्याची माहिती पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी दिली.
आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळांतील ३५ पाेलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पाेलिसांची नजर राहण्यासाठी, त्यांचा प्रेझेन्स दिसण्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये दाेन हजार २५० संवेदनशील ठिकाणांची नाेंद आहे. ॲपमुळे प्रभावी पाेलिसिंग हाेते. त्यामध्ये दर्शविलेल्या पाेलिस ठाण्यांमधील संवेदनशील ठिकाणे, पुतळे, ओसाड जागा आणि चेन स्नॅचिंगच्या ठिकाणी बीट मार्शलकडून पाहणी केली जाते. संबंधित पाेलिस अंमलदारांनी या ठिकाणी भेट दिली की नाही?, ती किती वाजता भेट दिली? त्याचबराेबर दिवसा आणि रात्री किती वेळा भेट दिली, अशी सर्व माहिती थेट पाेलिस निरीक्षकांपासून ते आयुक्तांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना ॲपद्वारे मिळते. पाेलिसांच्या पेट्राेलिंगची माहिती समजते. दिवसाला काेणत्या बीट मार्शलने भेट दिली किंवा नाही, याचाही आढावा थेट पाेलिस आयुक्तांकडून घेतला जाताे. त्यामुळे बहुतेक सर्वच पाेलिस कर्मचारी हे संबंधित ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतात.
७,८७७ अधिकारी, अंमलदारांची नाेंदणीॲपमध्ये नाेंदलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी हाणामारी, महिलांची छेडछाड, चेन स्नॅचिंग आणि इतरही गुन्हे हाेऊ नयेत. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण हाेण्यासाठी अशा ठिकाणी पाेलिसांची उपस्थिती आवश्यक असल्याने ॲपची निर्मिती केली आहे. त्याअंतर्गत सात हजार ८७७ अधिकारी, अंमलदारांची नाेंदणी केली. पाेलिसांची गैरहजेरी नाेंद झाल्याच्या ठिकाणच्या संबंधित पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे पाेलिस आयुक्तांकडून विचारणा हाेते.
असा हाेताे ॲपचा वापरसंवेदनशील ठिकाणी अंमलदाराने भेट दिल्यावर त्याला त्याच ठिकाणाहून स्वत:चा फाेटाे ॲपमध्ये टाकावा लागताे. त्यानंतर ॲपमधील ठिकाणी हिरवा रंग हाेताे. अन्यथा, त्या ठिकाणी लाल रंग दिसताे. संबंधित बीट मार्शलच्या नावाची वेळेसह नाेंद हाेते. त्यामुळे गस्तीचा प्रभावी परिणाम हाेत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.