शराब, कबाब अन लक्ष्मीदर्शनावर वॉच
By Admin | Updated: January 25, 2017 04:53 IST2017-01-25T04:53:03+5:302017-01-25T04:53:03+5:30
सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने कंबर कसली असून यंदा प्रथमच भरारी पथकांच्या मदतीला राज्य

शराब, कबाब अन लक्ष्मीदर्शनावर वॉच
ठाणे : सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने कंबर कसली असून यंदा प्रथमच भरारी पथकांच्या मदतीला राज्य उत्पादन शुल्क अधिकारी असणार आहेत. त्यामुळे मांस, मद्य, पैशांच्या उधळपट्टीवर या संयुक्त भरारी पथकाचा वॉच असणार आहे.
यासाठी ठाणे महापालिकेने चार वेगवेगळ्या प्रकारची भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन अशी ३६ पथके स्थापन केली जाणार आहेत. त्याशिवाय तीन मध्यवर्ती, ३६ व्हिडिओग्राफरचा समावेश असलेली १२ चलछायाचित्रण दक्षता पथके आणि ९ ते १० तपासणीनाके पथकांची स्थापन केली जाणार आहे. याची पूर्ण तयारी आता पालिकेने केली असून येत्या काही दिवसात ही पथके कामाला लागणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले.
या संदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या पथकांच्या स्थापनेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस, आरटीओ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. निवडणुकांसाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी नेमले असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन पथके तैनात असणार आहेत. त्यात प्रत्येकी पालिका किंवा सरकारचा एक अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा हेड कॉन्स्टेबल दर्जाचा एक कर्मचारी आणि एक व्हिडिओग्राफर तैनात केला जाणार आहे. मध्यवर्ती पथकात वर्ग दोन दर्जाचा सरकारी अधिकारी, उपनिरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आणि आरटीओकडील प्रत्येक एक अधिकारी, एक शिपाई आणि एक व्हिडिओग्राफर असणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली दोन व्हिडिओग्राफर कार्यरत असून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह घटनांचे छायाचित्रणही ते करतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. मतदानाला पाच ते सहा दिवसांचा अवधी शिल्लक असतांना ‘लक्ष्मीदर्शन’ आणि मद्य वाटपांचे काम मोठ्या प्रमाणात होत असते. त्यावर अकुंश बसवण्यासाठी नाका तपासणी पथकेसुद्धा तैनात ठेवली जाणार आहेत. शहरभरात प्रत्येक दिवशी ९ ते १० ठिकाणी चेकपोस्ट उभारल्या जाणार असून त्या पथकांमध्ये दोन पोलीस अधिकारी, एक सरकारी अधिकारी आणि एका व्हिडिओग्राफरचा समावेश असेल असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)