कल्याण पालिकेचेच कचरा फेको आंदोलन
By Admin | Updated: March 22, 2017 01:33 IST2017-03-22T01:33:40+5:302017-03-22T01:33:40+5:30
मोहनेतील बंद असलेल्या एनआरसी कंपनीने ५५ कोटींचा मालमत्ता कर थकवल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या

कल्याण पालिकेचेच कचरा फेको आंदोलन
कल्याण : मोहनेतील बंद असलेल्या एनआरसी कंपनीने ५५ कोटींचा मालमत्ता कर थकवल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या आवारात दहा गाड्या भरून कचरा फेकण्याचे ‘आंदोलन’ कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले. त्यातून कंपनी व्यवस्थापनाला धडा शिकवणे राहिले दूर, उलट आपल्या आवारात डम्पिंग ग्राऊंड होते आहे, या समजातून नागरिकांनी तीव्र विरोध करत चार कचरा गाड्यांची तोडफोड केली. शेवटी हा प्रकार मिटविण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. यापढेही कर थकवणाऱ्यांच्या दारी कचरा टाकून त्यांना ‘समज’ दिली जाईल, अशा इशारा पालिकेने दिला आहे, तर करवसुलीची ही पद्धतच चुकीची असल्याची टीका लोकप्रतिनिधींनी केली आहे.
महापालिकेचा २६२ कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. तो येत्या दहा दिवसांत वसूल करण्याचे लक्ष्य आयुक्त ई. रवींद्रन यांनी ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयाची झाडाझडती सुरु केली आहे. करवसूली कमी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणे, ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू आहे. एका रुग्णालयाला, वाधवा हॉलला आणि वाहनतळाला सीलही ठोकण्यात आले आहे.
एनआरसी कंपनी पालिकेच्या हद्दीत आहे. ती ९ नोव्हेंबर २००९ पासून बंद आहे. तिने कामगारांची देणी दिलेली नाही. देणी आणि जागाविक्रीचा वाद न्यायालयात आहे. कंपनी प्रशासनाने ५५ कोटींचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्याच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाला वारंवार नोटिसा बजावून थकबाकी भरण्याची मागणी केली. पण या नोटिसांना प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारी आयुक्तांनी ‘कंपनीच्या आवारात जाऊन कचरा टाका,’ असा आदेश दिला. महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या दहा मोठ्या आणि चार लहान गाड्या कंपनीजवळ गेल्या. त्या पाहिल्यावर कंपनीच्या जागी डम्पिंगचा पालिकेचा डाव असल्याचा समज नागरिकांचा झाला आणि त्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आणि संतप्त नागरिकांनी चार कचरा गाड्यांची तोडफोड केली. एका कचरा गाडीचालकास मारहाण केली. त्यामुळे पालिकेचे अधिकारी सुनील पाटील यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मध्यस्थी करुन नागरिकांना शांत केले आणि नेमका काय प्रकार आहे, याची माहिती दिली. तेव्हा नागरिकांचा राग शांत झाला. महापालिकेने कंपनीच्या गेटचे कुलूप तोडून आत दहा कचरागाड्या नेल्या. तेथे अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर कचरा ओतून पालिकेचे अधिकारी परतले. मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या जागेवर यापुढे अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने या कृतीतून दिला आणि कारवाईपासून वाचण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरावा, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)