ठाणे : धावती लोकल ट्रेन थांबताच दोन तांत्रिक कामगारांनी खाली उतरून ट्रेनच्या चाकांचे नटबोल्ट टाइट केले. हा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १वर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता घडला. या दुर्दैवी घटनेमुळे प्रवाशांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनवर कल्याणकडून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल ट्रेन दुपारी थांबली. प्लॅटफॉर्म क्र. १वर थांबलेली लोकल सुमारे पाच ते सहा मिनिटे थांबून होती. यादरम्यान दोन तांत्रिक कर्मचारी गाडीतून खाली उतरले. त्यांनी फर्स्ट क्लासचा डबा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगीखाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटना प्लॅटफॉर्म क्र. २वरील काही प्रवाशांनी प्रत्यक्ष पाहिली. एक कर्मचारी आत घुसलेला होता, तर दुसरा बाहेरून चाकांची पाहणी करून पान्याद्वारे नटबोल्ट टाइट करून ठोकठाक करताना आढळून आला. शहाड स्टेशनला थांबलेली नादुरुस्त ट्रेन प्रवाशांना घेऊन धावत असताना तिच्या चाकांजवळ काही तांत्रिक बिघाड झाला. मोटारमन किंवा तांत्रिक कामगारांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आला. त्यामुळे तत्काळ त्यांनी दुरुस्ती केली. योगायोगाने या गाडीत मध्य रेल्वेचे तांत्रिक कामगार असल्यामुळे त्यांनी दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे दुर्दैवी घटना टळल्याचे प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाले.
धावती लोकल थांबवून केले चाकांचे नटबोल्ट टाइट, शहाड स्थानकातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 01:23 IST