पोटनिवडणुकीसाठी मतदारांची यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST2021-02-22T04:30:15+5:302021-02-22T04:30:15+5:30
मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे ९ जून २०२० रोजी निधन झाल्याने रिक्त झालेल्या ...

पोटनिवडणुकीसाठी मतदारांची यादी प्रसिद्ध
मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे ९ जून २०२० रोजी निधन झाल्याने रिक्त झालेल्या भाईंदर पूर्वच्या प्रभाग १० मधील जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने २० हजार ७०९ मतदारांची मतदार यादी प्रसिद्ध केली असून, त्यावर हरकत, सूचनेसाठी २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
भाईंदर पूर्वच्या प्रभाग १० मध्ये ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तारा घरत, हरिश्चंद्र आमगावकर, स्नेहा पांडे व जयंती पाटील, असे चार नगरसेवक निवडून आले होते. कोरोनाकाळात प्रभागातील नागरिकांच्या मदतकार्यात सक्रिय असलेल्या आमगावकर यांना कोरोनाची लागण झाली. १३ दिवसांच्या कोरोनासोबतच्या झुंजीनंतर ९ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दुसऱ्या दिवशी १० जून रोजी कोरोनामुळे त्यांच्या आईचेही निधन झाले.
आमगावकर यांच्या निधनानंतर शिवसेना गटनेतेपदी नीलम ढवण यांची नियुक्ती करण्यात आली, तर प्रभागात रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लढविण्याची तयारी भाजपाने सुरू केली होती, तर शिवसेनेकडून आमगावकर यांच्या पत्नी पूजा यांना उमेदवारी दिली जाण्याचे निश्चित मानले जाते. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने या प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता.