महासभेत नगरसेवकांचा आवाज होतोय म्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:19+5:302021-02-25T04:55:19+5:30

महासभेत नगरसेवकांचा आवाज होतोय म्युट लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जात असल्याच्या मुद्द्यावर ...

The voice of corporators is muted in the general assembly | महासभेत नगरसेवकांचा आवाज होतोय म्यूट

महासभेत नगरसेवकांचा आवाज होतोय म्यूट

महासभेत नगरसेवकांचा आवाज होतोय म्युट

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जात असल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे पुन्हा आक्रमक झाले. १६ वर्षे एकाच जागेवर बसलेल्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करून अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पठाण यांनी पुन्हा एकदा सभागृहात नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला.

हजारो मतांनी निवडून येणारे नगरसेवक हे आपल्या प्रभागाच्या समस्या मांडून त्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने सभागृहामध्ये आपले मत मांडत असतात. मात्र, सध्या कोरोनाच्या नावाखाली घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन महासभेत प्रशासनाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की लगेचच संबंधित नगरसेवकाचा आवाज म्यूट करण्यात येतो. जे अधिकारी एकाच जागेवर १६ वर्षे ठाण मांडून बसलेले आहेत, अशा अधिकाऱ्यांकडूनच हा प्रकार होत आहे. नगरसेवकांचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचा आवाज दाबण्यासारखेच आहे. यासीन कुरेशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाला आपल्या न्याय्य मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा द्यावा लागत आहे. यावरूनच हे प्रशासन किती बेरकी आहे, याचा अंदाज येत आहे. जर नगरसेवकांनाच न्याय मिळत नसेल तर ते जनतेला काय न्याय देणार, असा सवाल आता जनतेमधूनच उपस्थित होणार आहे. नगरसेवक राष्ट्रवादीचा असो, की सेना-भाजप-काँग्रेसचा; त्यांचा आवाज दाबला जाणार असेल तर ते अजिबात सहन करणार नाही. जे अधिकारी असे कृत्य करीत आहेत, त्यांच्याविरोधात आपण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असे ते म्हणाले.

Web Title: The voice of corporators is muted in the general assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.