विवेक पंडिंतासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 26, 2017 00:01 IST2017-04-26T00:01:37+5:302017-04-26T00:01:37+5:30
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदा जमाव जमवून जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

विवेक पंडिंतासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पालघर : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदा जमाव जमवून जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून महिलांनी धक्काबुक्की केल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी विवेक पंडितासह अन्य १७ कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला.
विविध मागण्यांसंदर्भात काल श्रमजीवी संघटनेच्यावतीने पालघर जिल्हापरिषदेवर डोहाळे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा पोलिसांनी कार्यालयाबाहेर अडविल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांना भेटण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्यासह १० ते १५ कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन गेले होते. बालकांना पुरविण्यात येणारा सीलबंद टीएचआर पूरक आहार हा निकृष्ट असणे, अमृत आहाराची रक्कम आगाऊ मिळणे, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरीत भराव्यात,मानधन नियमित मिळावे इ. मागण्या घेऊन हे शिष्टमंडळ आले असता अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रि या हा विषय माझ्या अखत्यारीत येत असल्याने मी त्यावर योग्य ती कार्यवाही करते. मात्र इतर मागण्या पूर्ण करण्याचे अधिकार शासनाला असल्याने आपल्या मागण्या मी शासनाकडे पाठवते. असे सीईओ चौधरी यांनी सांगताच त्याने समाधानी न झाल्याने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात अडकवून ठेवण्यात आले होते. त्या नंतर त्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या शासकीय वाहनाने जात असताना बेकायदेशीर जमाव जमवून गाडी अडवून महिलांनी त्यांना रोखून धरले. या प्रकरणाने व्यथित झालेल्या निधी चौधरी यांनी आज पालघर पोलीस स्टेशनमध्ये संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस दिनेश पवार, पुतला पवार, सचिव प्रमोद पवार, सुनील लोणे, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, अनिता धांगडा,सीता घाटाळ, मिलिंद थुळे, कमलाकर भोरे, सरिता जाधव, गणेश उंबरसांडा, कैलास तुंबडा, सुरेश बर्डे, रेखा धांगडे, आत्माराम ठाकरे,रु पेश डोळे व इतर १८ ते १९ कार्यकर्त्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये तक्र ार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या सर्व आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे,बेकायदा जमाव जमविणे ई. कलमा सह गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. आज सकाळ पासूनच कालच्या घटनेचे प्रतिबिंब उमटून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध दर्शवित काम बंद ची हाक दिली. शिक्षक सेना, ग्रामविकास अधिकारी संघटनेने या आंदोलनात सहभाग दर्शविल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत व इतर कार्यालयाची कामे ठप्प पडली होती. निषेध मोर्चा काढून आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (वार्ताहर)