आभासी चलन घोटाळा, अकाउंटंट पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 05:49 IST2018-06-20T05:49:51+5:302018-06-20T05:49:51+5:30
कोट्यवधी रुपयांच्या आभासी चलन घोटाळ्यातील एका आरोपीने मंगळवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

आभासी चलन घोटाळा, अकाउंटंट पोलिसांना शरण
ठाणे : कोट्यवधी रुपयांच्या आभासी चलन घोटाळ्यातील एका आरोपीने मंगळवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या प्रकरणातील प्रमुख आरोपीच्या कंपनीमध्ये तो अकाउंटंट म्हणून नोकरीला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो दुबईमध्ये फरार होता.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरिएंट पार्क’ येथील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’चा सूत्रधार अमित लखनपाल आणि त्याच्या साथीदारांनी एमटीसी या आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्ली येथील प्रवीण अग्रवाल यांनी ४ जून रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ कडे केली होती.
डोंबिवली येथील सचिन शेलार हा फ्लिनस्टोन ग्रुपमध्ये अकाउंटंट म्हणून नोकरीला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो दुबईला फरार झाला होता.मायदेशी परतताच त्याला अटक करता यावी, यासाठी त्याच्याविरुद्ध लूकआऊट सर्क्युलरही जारी करण्यात आले होते. चोहीकडून कोंडी झाल्याने सचिनने दुबईहून परतल्यानंतर ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करली. अमित लखनपालसोबत तो ५-६ वर्षांपासून कामाला आहे. त्यामुळे त्याला कंपनीसोबतच लखनपालचेही सर्व व्यवहार माहीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. न्यायालयाने त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रमुख आरोपी अमित लखनपाल हादेखील दुबईलाच पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.