प्रेमाच्या संशयातून प्रणयचा बळी

By Admin | Updated: January 26, 2017 03:02 IST2017-01-26T03:02:16+5:302017-01-26T03:02:16+5:30

आपला अभ्यास, आपले काम आणि आपला ग्रुप यांच्यातच रमणारा, अशी प्रणय मोरेची ओळख होती. कोणाच्याही अध्यातमध्यात नसणाऱ्या

The victim is the victim of love | प्रेमाच्या संशयातून प्रणयचा बळी

प्रेमाच्या संशयातून प्रणयचा बळी

आकाश गायकवाड / डोंबिवली
आपला अभ्यास, आपले काम आणि आपला ग्रुप यांच्यातच रमणारा, अशी प्रणय मोरेची ओळख होती. कोणाच्याही अध्यातमध्यात नसणाऱ्या प्रणयचा केवळ प्रेमप्रकरणाच्या संशयापोटी नाहक बळी गेल्याने कॉलेज आणि त्याच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
सागर्ली गावातील साउथ इंडियन कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रथम वर्षाला प्रणय शिकत होता. शांत आणि अभ्यासू स्वभाव असलेला प्रणय केवळ आपल्याच्या विश्वात रममाण असायचा. प्रणय नेहमी त्याच्या ग्रुपमधील मित्रमैत्रिणींसोबतच असे. परंतु, त्यांच्या ग्रुपमधील एका तरुणीचे आरोपी विघ्नेश सरकटे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. ते लग्नही करणार होते. परंतु, विघ्नेश हा अकरावी नापास आहे. तो कोणताही कामधंदा न करता त्याचा बालमित्र योगेश जैस्वाल याच्यासोबत दिवसभर टपोरीगिरी करत फिरत असे. या दोघांवर अल्पवयीन असतानाचे मारामारीचे गुन्हे मानपाडा व टिळकनगर पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. ही माहिती त्या तरुणीच्या कुटुंबीयांना व भावाला माहीत होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. परंतु, तरुणीला ते मान्य नव्हते. तिने कुटुंबीयांविरोधात जाऊन हे प्रेमप्रकरण सुरूच ठेवले होते. नंतर, हळूहळू तिला विघ्नेशची टपोरीगिरी आणि स्वभाव माहीत झाला.
एक दिवस ती तिच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असताना विघ्नेशने तिला मित्रांशी बोलण्यास विरोध केला. तसेच कॉलेजबाहेर तिच्या कानशिलात लगावली. त्यामुळे तिचा त्याच्याविषयीचा विश्वास उडाला. ती त्याला भेटण्यास टाळू लागली. तरीही, तो तिला भेटण्यासाठी त्रास देत होता. अखेर, तिने चार महिन्यांपूर्वी त्याला सज्जड दम देत आपल्यात आता कोणतेच नाते नाही, असे सरळ सांगून टाकले होते. त्यानंतर, तिने अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊन प्रणयच्या ग्रुपमध्ये मिसळली होती. केवळ अभ्यासातून वेळ मिळालाच, तर ग्रुपबरोबर ती फिरत असल्याची माहिती विघ्नेशला मिळाली होती. प्रेमभंग झाल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. विघ्नेश तिला प्रणयसोबत बोलताना आणि फिरताना पाहत होता. त्याची सल त्याच्या मनात होती.अखेर, त्याने प्रणयचा काटा काढायचा प्लान आखला. त्याने यासाठी त्याचा जिवलग मित्र योगेशची मदत घेतली. त्यांनी आधीच मुंबईत कपडे खरेदीसाठी गेले असताना चोरबाजारातून सुरा आणि चॉपर विकत घेतले होते. शुक्रवार, २० जानेवारीला ते प्रणयवर हल्ला करणार होते. परंतु, त्याच्यासोबत मित्रमैत्रिणी असल्याने त्यांचा डाव फसला. शनिवारीही त्यांना काही करता आले नाही. रविवारी कॉलेजला सुटी होती. त्यात, सोमवारी विघ्नेशचा वाढदिवस असल्याने योगेश त्याच्या घरी वस्तीला राहिला होता. त्याच रात्री दोघांनी प्रणयचा मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत खून करण्याचा प्लान आखला. मंगळवारी सकाळपासूनच ते प्रणयवर पळत ठेवून होते. दुपारी १२ च्या सुमारास आॅफ पिरियड असल्याने प्रणय दोन मैत्रिणींसह कॉलेजबाहेरील रिक्षात बसला होता. तेव्हा मात्र विघ्नेशची प्रेयसी कॉलेजमधील दुसऱ्या अभ्यासाच्या तासाला बसली होती. हीच संधी साधून विघ्नेश आणि योगेश त्याच्याजवळ गेले. बोलण्याच्या बहाण्याने ते त्याला बाजूला घेऊन गेले. तेथेच त्याच्यावर चॉपर आणि सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून पसार झाले.

Web Title: The victim is the victim of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.