पावसाळ्यात १२०० वृक्षांचा बळी
By Admin | Updated: June 29, 2017 02:50 IST2017-06-29T02:50:26+5:302017-06-29T02:50:26+5:30
१ ते ७ जुलै दरम्यान तब्बल ४ कोटींची वृक्ष लागवड करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. मात्र, एकीकडे वृक्षलागवडीसाठी

पावसाळ्यात १२०० वृक्षांचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : १ ते ७ जुलै दरम्यान तब्बल ४ कोटींची वृक्ष लागवड करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. मात्र, एकीकडे वृक्षलागवडीसाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिका अनेक वृक्षांना जीवदान देण्यात अपयशी ठरली आहे. नागरीकरणाच्या नादात तब्बल १२०० वृक्षांचा बळी गेला आहे.
ठाणे महापालिका गेल्या वर्षापासून वेगवेगळ्या संकल्पना राबवत आहे. परंतु, दुसरीकडे जुन्या वृक्षांना जीवदान देण्याबाबत ती सपशेल अपयशी ठरली आहे. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास या कालावधीत तब्बल १ हजार १९९ वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदाही जून महिना संपत नाही तोवरच तब्बल १५० वृक्ष पडल्याच्या नोंदी पालिकेच्या दप्तरी आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व झाडांची मुळे सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे अतिशय कमकुवत झाली असून अजूनही या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास शहरातील जुनी झाडे नामशेष होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत ते अधिकच वाढले आहे. २०१५-१६ या वर्षात ४४६ झाडे पडली होती, तर ५७ झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. २०१६-१७ या वर्षी ५९५ झाडे पडली, तर २०१७-१८ मध्ये पावसाळ्यातच १५० झाडे पडल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जी झाडे पडली, ती सर्व रस्त्याच्या कडेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकाराला शहरीकरण जबाबदार असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. रुंदीकरणाबरोबरच विकासकामेही झाली आहेत. याचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेच्या जुन्या झाडांना बसला आहे. सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे या सर्व झाडांची मुळे कमकुवत झाल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक कौस्तुभ दरवसे यांनी दिली. जी झाडे रस्त्याच्या कडेला लावली आहेत, त्यांच्या सभोवताली १ मीटर जागा सोडणे आवश्यक असताना कोणत्याच झाडाभोवती ती सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे झाडांच्या मुळांवर परिणाम झाला आहे.
झाडांच्या फांद्यादेखील अशास्त्रीय पद्धतीने छाटत असल्याने झाडांचा तोल जाऊन ती पडण्याच्या घटना वाढल्याचे ते म्हणाले. फांद्या छाटताना पर्यावरण अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली छाटणे आवश्यक आहे. मात्र, केवळ लोकप्रतिनिधी किंवा कोणाची तक्रार आल्यास महापालिकेचे कर्मचारी शास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटतात.