म्हाडाच्या जागेवर भाजी मार्केट
By Admin | Updated: November 15, 2016 04:31 IST2016-11-15T04:31:04+5:302016-11-15T04:31:04+5:30
अंबरनाथ पश्चिमेकडे नगर परिषद विकास योजनेत वाहतूक पोलीस स्टेशन, दूध केंद्र आणि भाजी मार्केट हे म्हाडाच्या जागेवर उभारण्याच्या आ. डॉ. बालाजी किणीकर

म्हाडाच्या जागेवर भाजी मार्केट
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेकडे नगर परिषद विकास योजनेत वाहतूक पोलीस स्टेशन, दूध केंद्र आणि भाजी मार्केट हे म्हाडाच्या जागेवर उभारण्याच्या आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या मागणीला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. या भूखंडांची मोजणी करून ते नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. हे भूखंड नगर परिषदेकडे हस्तांतरित केल्यामुळे अंबरनाथकरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे किणीकर म्हणाले.
अनेक वर्षांपासून वाहतूक पोलीस स्टेशन हे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेवर सुरू होते. त्यामुळे नगर परिषदेने आरक्षित केलेल्या म्हाडाच्या भूखंडावर वाहतूक पोलिसांकरिता अत्याधुनिक सुविधांसह नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात यावे, याकरिता आमदार डॉ. किणीकर प्रयत्नशील होते. या जागेचा विकास करण्यासाठी ही जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्याची गरज असल्याने त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वायकर यांनी सदर जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
या वेळी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, मुख्याधिकारी गणेश देशमुख, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, कोकण बोर्डाचे मुख्याधिकारी विजय लहाने तसेच म्हाडाचे व नगर परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)