भाजीपाला गडगडला!
By Admin | Updated: December 30, 2016 04:06 IST2016-12-30T04:06:10+5:302016-12-30T04:06:10+5:30
एकीकडे नोटाबंदी आणि आवक वाढल्याचा फटका भाजीबाजाराला बसल्याने भाव गडगडले आहे. या काळात बाजारात राजा समजल्या जाणाऱ्या मटाराचा भाव किलोला

भाजीपाला गडगडला!
मुरलीधर भवार/जान्हवी मोर्ये, कल्याण
एकीकडे नोटाबंदी आणि आवक वाढल्याचा फटका भाजीबाजाराला बसल्याने भाव गडगडले आहे. या काळात बाजारात राजा समजल्या जाणाऱ्या मटाराचा भाव किलोला १० ते १२ रुपये इतका घसरला आहे. भाव पडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असले तरी नोटाबंदीच्या पन्नास दिवसांत स्वस्त भाजीपाल्याचा एकमेव दिलासा मिळाल्याने ग्राहक खुशीत आहेत.
भाजीपाल्याचे भावही सतत गडगडत गेल्याने बाजाराला हुडहुडी भरल्याची स्थिती कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येते.
भाजीपाल्याचे व्यापारी मोहन नाईक यांनी सांगितले, बाजारात भाजीपाल्याचा राजा म्हणून मटाराची ओळख आहे. एरवी बाजार गरम असल्यावर या हिरव्या वाटाण्याला १०० रुपये किलोचा भाव मिळतो. आत्ता तो किलोला १० ते १२ रुपये दराने विकला जात आहे. हा वाटाणा मध्य प्रदेशातून येतो. एक पोते वाटाणा खुडण्यासाठी एक महिला २५० ते ३०० रुपये घेते. शेतकऱ्याला जागेवर वाटाण्याला किमान १८ ते २० रुपये किलोचा भाव मिळणे अपेक्षित आहे. पण त्याचा बाजार घसरल्याने शेतकऱ्याला जागेवर किलोमागे पाच रुपयांचा भाव मिळतो आहे.
नोटाबंदीचा सगळ््यात जास्त फटका भाजी व्यापाराला बसला आहे, असा तपशील देऊन ते म्हणाले, रोख पैसे नसल्याने व्यापारी बाजारात माल खरेदीसाठी जात नाहीत. शेतकरी पिकविलेला भाजीपाला न विकताच तसेच सोडून जात आहेत, इतकी भीषण परिस्थिती आहे. काही शेतकरी पिकविलेला माल फेकून देण्याऐवजी किरकोळ भावात विकून घरचा रस्ता गाठतात. उत्पादन खर्चही निघत नाही. चांगली थंडी पडली. दव पडले; तर उत्पादन चांगले होते. आता उत्पादन चांगले आहे. आवक चांगली आहे, पण मालाला भाव नाही. एका पोत्याची म्हणजेच बारदानाची किंमत २० रुपये आहे. रिकाम़्या बारदानाला २० रुपये आणि आतील मालाला किलोला १२ रुपये ही परिस्थितीच बाजाराचे व्यस्त आणि विषण्ण करणारे चित्र दाखविणारी आहे.
वांगी, मिरची, कोबीही घसरला
मटाराप्रमाणेच इतर भाज्यांचेही भाव गडगडले आहेत. वांगी ५० रुपयांना १५ किलो, सिमला मिरची ८ ते १० रुपये किलो, फ्लॉवर चार ते पाच रुपये किलो, कोबी पाच रुपये किलो, गवार व भेंडीची फारशी आवक नाही, अशी स्थिती आहे.
कांदा-बटाटा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात आहे. गवार-भेंडीची आवक घटली आहे. कल्याणमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजी-पाल्यालाही सध्या फारसा भाव नाही.
टोमॅटोची २५ किलोची जाळी १०० ते १२५ रुपये दराने विकली जात आहे. टोमॅटोला दहा रुपयांला दोन किलो असा दर आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी ट्रकच्या ट्रक माल फेकून देत आहेत.
ग्राहकांची चंगळ
बाजारात मटाराचे रोज १० ते १५ ट्रक येतात. एका ट्रकमध्ये ९ टन मटार असतो. किमान ९० टन व कमाल १३५ टन हिरवा वाटाणा येतो. त्याला उठाव नाही. त्यामुळे भाव पडला आहे. पण ग्राहकांची चंगळ झाली आहे.
थेट भाजीपाला विक्री केंद्रे
बाजारात मालाची आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकाला स्वस्त दरात भाजी मिळते आहे. बचत गटाच्या माध्यमातून थेट भाजीपाला विक्री केंद्रे कल्याण परिसरात सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्राहकाचा थेट फायदा होणार आहे, असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.
डोंबिवलीतही भाज्या स्वस्त
डोंबिवली : थंडीमुळे भाजीपाल्याची आवक वाढल्याने डोंबिवलीतही भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहेत. नोटाबंदीचा फटका बाजाराला बसल्याचे प्रत्यक्ष फेरफटका मारल्यावर दिसून येते. आवक अशीच वाढत राहिली, तर तरी भाज्यांचे दर आणखी कमी होतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. सध्या भाज्यांचे दर २० ते २५ टक्के कमी झाल्याची माहिती भाजीविक्रेते अजय जाधव यांनी दिली.
भाज्या आधीचे दर आताचे दर
कोबी ४०-६०२०
फ्लॉवर४५-५०२०
वांगी ५०-६०२०-२५
घेवडा४५१५-१६
गवार ८०-९०६०-६५
हिरवा वाटाणा -१५-२०
पडवळ५०-६०३०-४०
हिरवी मिरची ४०१८-२०
सिमला मिरची ४०-५०२०-२५
भेंडी८०५०-६०
लाल भोपळा ३०१०-१२
तोंडली७०-८०४०
दोडका६०-६५४०-४८
टोमॅटो ५०-६०१०
गाजर-२०-२५
कारली६०-६५५०
काकडी४०-५०
दुधी६०-६५४०
दर किलोचे आहेत.
(हे दर डोंबिवलीच्या किरकोळ
बाजारातील आहेत.)