गुरुवारी समिती काढणार वसईत इशारा मोर्चा
By Admin | Updated: January 25, 2017 04:31 IST2017-01-25T04:31:10+5:302017-01-25T04:31:10+5:30
वसईच्या ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय नसल्याने शहर बससेवा अखंडीतपणे सुरुच राहावी व त्याचबरोबर २९ गावे महापालिकेतून वगळण्यासाठी

गुरुवारी समिती काढणार वसईत इशारा मोर्चा
शशी करपे / वसई
वसईच्या ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय नसल्याने शहर बससेवा अखंडीतपणे सुरुच राहावी व त्याचबरोबर २९ गावे महापालिकेतून वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोर्टात बाजू मांडावी या मागण्यांसाठी २६ जानेवारीला तहसिल कचेरीवर मोर्चा नेण्यात येणार आहे.
वसई विरार महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेली जनआंदोलन समिती एसटी बचावचा नारा देत वसईच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होतांना दिसते आहे. जनआंदोलन समितीने केलेल्या आंदोलनांमुळेच विवेक पंडित आमदार झाले होते. तर वसई विरार महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत समितीचे २१ नगरसेवक निवडून आले होते. इतकेच नाही तर जनआंदोलन समितीने वसई पंचायत समितीची सत्ता खेचून आणून जिल्हा परिषदेच्या सत्तेतही सहभाग घेतला होता.
मात्र, अवघ्या पाच वर्षात जनआंदोलनाची धार बोथट झाली होती. जनआंदोलन समितीतून सर्वपक्षीय नेते बाहेर पडले होते. त्यानंतर समितीला ग्रहण लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित पराभूत झाले. त्यानंतर पंडितांनी वसईच्या राजकारणापासून फारकत घेत अलिप्त राहणेच पसंत केले होते. परिणामी वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत समितीने सपाटून मार खाल्ला होता. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही समितीचा दारूण पराभव झाला होता. एकूणच वसईच्या राजकीय क्षितिजावरून जनआंदोलन समिती अस्तंगत झाली होती.
जनआंदोलन समितीचे अस्तित्व टिकण्यासाठी डॉमणिका डाबरे, मिलिंंद खानोलकर, प्रफुल्ल ठाकूर, शाम पाटकर, सुनिल डिसिल्वा यांच्यासह काही मोजकेच चेहरे अजून धडपड करीत आहेत. एसटीच्या निमित्ताने समितीला संजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाने १ जानेवारीपासून वसईतील एसटीची शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी समितीने केलेल्या आंदोलनाला वसईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. हाच धागा पकडून समितीने आंदोलनाच्या निमित्ताने वसईच्या पश्चिम पट्ट्यात पाय रोवण्याचा प्रयत्न सुुरु केला आहे. एसटी बचावचा नारा देत समितीने गावागावात बैठका घेतल्या होत्या. त्याला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एसटीसाठी गावकरी रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे लक्षात आलेल्या समितीने वसईत एसटी कायमस्वरुपी सुरु रहावी यासाठी वसई तहसिल कचेररीवर २६ जानेवारीला मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे.
हा मोर्चा दुपारी ३ वाजता चिमाजी आप्पा मैदानावरून निघणार आहे. पहाटे ३.३० वाजता निघणारी पहिली आणि रात्री २.३० वाजता जाणारी एसटी १ जानेवारीपासून महामंडळाने अचानक बंद केली. त्यामुळे मुंबईला दुध, भाजीपाला विकण्यासाठी जाणारे शेतकरी, विद्यार्थी, चाकरमानी यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.महापालिकेने त्यांची परिवहन सेवा सुरु केल्याचे कारण यावेळी महामंडळाने दिले होते.
मात्र,महापालिकेची पहिली बस सकाळी सात वाजता सुरु होवून शेवटची बस रात्री ९ वाजता सुटते. त्यामुळे परिवहन सेवेचे दिलेले कारण खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेवून पहाटे पाच वाजता नालासोपारा डेपोत ठिय्या मांडून सर्व एसट्या अडवून धरल्या.ऐन परिक्षेच्या तोंडावर ही सेवा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी ३१ मार्चपर्यंत सेवा सुरु ठेऊन महामंडळाने ग्रामस्थांना दिलासा दिला.