वसई, विरार-पालघर, डहाणू प्रवाशांत संघर्ष?
By Admin | Updated: October 14, 2016 06:06 IST2016-10-14T06:06:05+5:302016-10-14T06:06:05+5:30
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार दरम्यान मुबलक लोकल ट्रेन सेवा असताना मुंबई सेंट्रल वरून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याचा ट्रेन मधून

वसई, विरार-पालघर, डहाणू प्रवाशांत संघर्ष?
पालघर : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार दरम्यान मुबलक लोकल ट्रेन सेवा असताना मुंबई सेंट्रल वरून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याचा ट्रेन मधून प्रवास करीत पालघर-डहाणूच्या दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करणाऱ्या विरारच्या प्रवाशां विरोधात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या विरोधात सोशल मिडियावरील रेल रोकोच्या मेसेजला मोठा पाठिंबा मिळत आहे.
पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील विरार ते डहाणू दरम्यानच्या भागाला सन १९९९ मध्ये उपनगरीय क्षेत्र म्हणून रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.परंतु या घोषणेनंतर रेल्वे सेवा सुरु होण्याच्या हालचालींना वेग येईल ही इथल्या प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे इथल्या प्रवासी संघटनेने वेळोवेळी रेल्वे प्रशासनास निवेदनाद्वारे मागण्या केल्या. मात्र त्या पत्रव्यवहाराचा कुठलाही परिणाम न झाल्याने शेवटी स्थानिक प्रवाशांना पालघर-डहाणू ते विरार ते पुढे चर्चगेट असा प्रवास अनेक वर्षे उभ्याने, कोंदटलेल्या वातावरणात करण्याची पाळी ओढवली. प्रवासी संघटना आणि प्रवासी यांनी अनेक वेळा रेल रोको आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांनी प्रवाशांच्या समस्याही मांडल्या. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी १६ एप्रिल २०१६ रोजी उपनगरीय लोकल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली.
लोकल वाहतूक सुरु करण्यात आल्याने आपली अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने आता सुखासमाधानाने प्रवास करता येईल ह्या स्थानिकांच्या अपेक्षेला रेल्वे प्रशासनाने धक्का देत मोजक्याच आणि अपुऱ्या लोकल सेवा दिल्या. त्यामुळे नाईलाजाने पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे इ. भागातील प्रवाशांना पुन्हा मेल, एक्सप्रेस वर अवलंबून रहावे लागले.परंतु मुंबई सेंट्रल वरून सुटणाऱ्या वलसाड एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल, लोकशक्ती एक्स्प्रेस ह्या रात्री सुटणाऱ्या गाड्याना विरार स्टेशनला थांबा देण्यात आल्याचा फायदा उचलीत विरारच्या प्रवाशांनी सफाळेपर्यंत रेल्वे पास काढून विरार पर्यंत प्रवास करण्याची क्लृप्ती शोधून काढली. चर्चगेट ते विरार दरम्यान दर पंधरा मिनिटांनी एक लोकल गाडी असतानाही मोठ्या संख्येने विरार चे प्रवासी या एक्स्प्रेस मध्ये चढू लागल्याचा फटका पालघर, डहाणू तील प्रवाशांना बसून रेल्वे पोलीस, टीसी यांनी त्रास द्यायला सुरु वात केली. विरारच्या प्रवाशांसाठी दर पंधरा मिनिटांनी लोकल सेवा असताना त्यांनी लांब पल्याच्या ट्रेन मधून प्रवास करणेच चुकीचे असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केल्या गेल्यात परंतु त्यांची कोणतीही दखल रेल्वेने घेतली नाही. त्यामुळे आता उग्र आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. (वार्ताहर)