लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : विकासाला आमचा विरोध नाही; परंतु विकासाच्या नावाखाली भूखंडमाफिया शेतक-यांच्या जमिनीवर वरवंटा फिरवित असतील, तर त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे शिवसेनेच्या आ. नीलम गो-हे यांनी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील दिल्ली-मुंबई कॉरिडोर विजयी मेळावा कार्यक्र मात बोलताना सांगितले.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरविरोधी चालवलेल्या लढ्यात विजय संपादन केल्याबाबत सर्वहारा जन आंदोलन रायगड व कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारी कुणबी भवन इंदापूर, ता. माणगाव या ठिकाणी विजयी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या आ. नीलम गो-हे बोलत होत्या. नीलम गोºहे यांनी हा लोकशाहीचा फार मोठा विजय आहे. तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी न पडता लढायला तयार राहता, ही वेगळी ताकद तुमच्या सर्वांमध्ये आहे. जनतेची ताकद मजबूत करण्यासाठी तुम्ही आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आम्ही तुमच्यात सक्रिय राहू. विधिमंडळात तुमचे प्रश्न मांडून उद्योगमंत्री व सभापती यांनी त्यांची दखल घेत या पुढे शेतकºयांच्या संमतीशिवाय जमीन संपादित केली जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय दिल्याचे सांगितले.आ. धैर्यशील पाटील यांनी जमिनी सक्तीने संपादित केल्या जात असतील तर त्याला विरोध कसा करायचा, हे आम्हाला माहीत आहे. जिल्ह्यात आणलेल्या रिलायन्स कंपनीला आम्ही पळवून लावले. कॉरिडोरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने जपानवाल्यांना पळवून लावले, याचा अभिमान वाटतो. उल्का महाजन यांनी आपण विजय खेचून आणला, असे सांगितले. देशात पाच कॉरिडोर येऊ घातले असून, देशातील एकूण जमिनीपैकी ४० टक्के जमीन कॉरिडोरसाठी जाणार आहे. सरकार आपले कायदे बदलणार असेल, तर सरकारला वठणीवर आणण्यासाठी आपली अशीच एकजूट यापुढे राहू द्या, असा सल्ला त्यांनी दिला.या कार्यक्रमास आ. धैर्यशील पाटील, सर्वहारा जन आंदोलन कार्यकर्त्या उल्का महाजन, संदेश कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार आदी मान्यवरांसह माणगाव-रोहा विभाग, निजामपूर विभाग, पाणसई विभाग, तळा विभाग, वावेदिवाळी विभाग येथून शेतकरी बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विकासाच्या नावाखाली शेतक-यांच्या जमिनीवर वरवंटा - नीलम गो-हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:29 IST