वंजारी समाज कोरोनाकाळात ठरतोय अन्नदाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST2021-05-05T05:06:00+5:302021-05-05T05:06:00+5:30
ठाणे : वंजारी समाजाने कोरोना काळात घाबरण्याची गरज नाही असा धीर देऊन ‘आम्ही आहोत आपल्यासाठी’ अशी आपुलकीची साद ...

वंजारी समाज कोरोनाकाळात ठरतोय अन्नदाता
ठाणे : वंजारी समाजाने कोरोना काळात घाबरण्याची गरज नाही असा धीर देऊन ‘आम्ही आहोत आपल्यासाठी’ अशी आपुलकीची साद या संकटात त्यांनी ठाणेकरांना दिली आहे. ज्या लहान मुलांचे आईवडील कोरोनाचे उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यासाठी तसेच जे ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या परिस्थितीत जेवण बनवू शकत नाहीत, अशांसाठी दोन वेळच्या मोफत जेवणाच्या डब्याची सोय समाजाने केली आहे.
आज कोरोनाची परिस्थिती संपूर्ण भारतात खूप बिकट आहे. काहींच्या घरात आई आणि वडील दोघेही कोविड पॉझिटिव्ह असल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. घरी बारा-तेरा वर्षांचा मुलगा आहे. किंवा छोटी मुलगी आहे. अशा परिस्थितीत ते बाहेरून जेवण किंवा खाण्याचे पदार्थ मागवू शकत नाहीत ना घरी बनवू शकत, तसेच आजीआजोबांच्या जेवणाची सोय कुठूनही होत नाही अशांसाठी वंजारी समाजाचे गजानन आंधळे यांच्या संकल्पनेतून मोफत जेवणाचा घरपोच डब्याची ही सोय केली आहे. पाच दिवसांपूर्वी ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली असून पहिल्या दिवशी त्यांनी आठ जणांना तर सोमवारी पाचव्या दिवशी ३५ जणांना दोन वेळचे मोफत जेवणाचे डबे दिले. मनुष्यबळ कमी असल्याने ही सेवा सध्या ठाणे शहरापुरती मर्यादित आहे. वंजारी समाजातील दात्यांनी वर्गणी काढून ही सेवा सुरू केल्याचे ते म्हणाले. ज्या गरजूंना मोफत जेवणाचा डबा हवा असल्यास त्यांनी ९९२००१५५४६० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. आंधळे हे स्वतः रोज दहा भिक्षुकाची या संकट काळात आपल्या जेवणाची सोय करीत आहेत. शिवाजी वाघ, विजय चांगळे, संदीप चाकोर, सहदेव जायेबाये, दीपक नागरे, राजकुमार माने, नयन खारडे अशा अनेक समाजबांधवांचे यात सहकार्य मिळत आहे, असे आंधळे म्हणाले.
------------------------------
हातावर पोट असणाऱ्यांनाही मिळणार डबा
वंजारी समाजाने हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. त्यांनाही जेवणाचे मोफत डबे घरपोच दिले जाणार आहे.
असा असतो जेवणाचा डबा
या डब्यात चार चपाती, भात, वरण, एक सुकी भाजी आणि गोड पदार्थांचा समावेश असतो.
------------