प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात स्मशानभूमीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:10 AM2021-01-14T01:10:24+5:302021-01-14T01:10:37+5:30

खासगी डॉक्टरांकडून पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लूट

Vanava cemetery in Thane district for cremation of animals | प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात स्मशानभूमीची वानवा

प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात स्मशानभूमीची वानवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनापाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूचाही शिरकाव झाला आहे. अशातच ठाणे जिल्ह्यात पशुप्राण्यांसाठी एकही स्मशानभूमी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सध्या ठाण्यात मृत पक्ष्यांची विल्हेवाट घनकचऱ्याच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे ठाण्यातही पशुप्राण्यांसाठी स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी मनसेच्या जनहित व विधि विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केली.

ठाणे शहरात सुमारे ४ हजार ३०० पाळीव, तर १० हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत. याशिवाय मांजर, पक्षी अशांची संख्या अधिक आहे. या पक्षी-प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा यक्षप्रश्न प्राणिप्रेमींसमोर आहे. काही जण मुंबईच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करतात, तर काही जण येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत त्यांची विल्हेवाट लावतात. खासगी डॉक्टरांकडून यासाठी तीन हजारांपासून १० हजारांपर्यंत शुल्क आकारले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिका हद्दीत प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण ठाणे, पालघर आणि रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये खास प्राण्यांसाठी अशी स्मशानभूमी अस्तित्वात नाही. 
दरम्यान, एक-दीड वर्षापूर्वी प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी जागा निश्चितीबाबत महासभेत विषय मांडण्यात आला होता. मात्र त्यास मंजुरी मिळालेली नाही. 
सध्या ठाण्यात मृत होणाऱ्या पक्ष्यांची विल्हेवाट ही घनकचऱ्याच्या माध्यमातून केली जात असल्याचे ठाणे महापालिका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाण्यात प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यातदेखील प्राण्यांसाठी स्मशानभूमी लवकरात लवकर विकसित करण्यात यावी.    
    - स्वप्निल महिंद्रकर, मनसे
ठाणे जिल्ह्यात सध्या पशुप्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही. त्या-त्या महापालिकेच्या हद्दीतील प्रशासनाने ती उपाययोजना करावयाची असते.    - लक्ष्मण पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, जि.प.
 

Web Title: Vanava cemetery in Thane district for cremation of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे