वडवली गाव बुडाले शोकसागरात
By Admin | Updated: February 29, 2016 01:54 IST2016-02-29T01:54:39+5:302016-02-29T01:54:39+5:30
वडवलीमध्ये अन्वर वरेकर यांच्या घरात एक, दोन नव्हे तर १४ जणांचे खून आणि एकाची आत्महत्या झाल्याचे वृत्त संपूर्ण गावात पसरताच या गावावर एकच सन्नाटा पसरला

वडवली गाव बुडाले शोकसागरात
जितेंद्र कालेकर, ठाणे
वडवलीमध्ये अन्वर वरेकर यांच्या घरात एक, दोन नव्हे तर १४ जणांचे खून आणि एकाची आत्महत्या झाल्याचे वृत्त संपूर्ण गावात पसरताच या गावावर एकच सन्नाटा पसरला. या हत्याकांडात अगदी दोन आणि चार महिन्यांच्या मुलींसह पाच महिलांचाही समावेश असल्याची माहिती समजताच संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली.
अन्वर वरेकर हे कुटुंब शांतताप्रिय, भांडण आणि वादापासून अलिप्त. कोणाच्याही मदतीला धावून जाण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. तर, आपल्या नातेवाईक आणि मित्रांपुढे चांगल्या वागणुकीने एक आदर्श निर्माण करणारा त्यांचा मुलगा हुसनैन याच्याकडूनच हे कृत्य घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात कोपरखैरणे येथील सर्व सात तर ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्वर, हुसनैन यांच्यासह आठ जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन झाले. तीन तास शवविच्छेदन झाल्यानंतर कोपरखैरणे, भिवंडी आणि वडवली येथे हे मृतदेह नेण्यात आले. सर्वात आधी कोपरखैरणे येथे शबिना खान हिच्यासह सात जणांचा तर अरसिया (५ महिने) हिच्यावर भिवंडीतील म्हापोली येथे दफनविधी झाला. त्यानंतर, सायंकाळी ७ वा. नंतर अन्वर वरेकर, हुसनैन वरेकर यांच्यासह सात जणांचा रात्री ८ पर्यंत दफनविधी केला. या काळात या संपूर्ण परिसरात अनेकांच्या घरांमध्ये दुपारचे जेवणही बनविले गेले नव्हते.
ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना वाढत आहेत. नातेवाइकांची अशी निर्घृणपणे हत्या करणे, हा मोठा गुन्हा आहे आणि त्यानंतर स्वत:चेही जीवन संपवणे, यातून काय साध्य करायचे होते, हे माहीत नाही.
- राजेंद्र पगारे, लेखाधिकारी, ठाणेअतिशय थरकाप उडवणारी ही घटना आहे. असे क्रूर कृत्य करायला हात धजावतात तरी कसे? याचे आश्चर्य वाटते. हे कृत्य करणारी व्यक्ती मानसिक दडपणाखाली किंवा रागीट स्वभावाची असावी, असे वाटते. मात्र, खरे कारण समजल्यावर या हत्याकांडाचा उलगडा होईल. या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे.
- यशवंत भोसले, ज्येष्ठ नागरिक, ठाणेठाण्यात घडलेले हे हत्याकांड धक्कादायक आहे. या घटनेत थोडक्यात बचावलेल्या जखमी महिलेने आपल्याच भावाने हा प्रकार केल्याचे सांगितले. अद्याप कारण समजले नाही. परंतु, अशा प्रकारे हत्या करणे कितपत योग्य आहे. कौटुंबिक वादातून हे घडले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसे असले तरी यात लहान मुलांचा का जीव घेतला? त्यांचीही दया हे कृत्य करणाऱ्याला आली नसेल का, असा प्रश्न पडतो.
- प्रसाद कामते, विद्यार्थी, कळवा एकाच घरातील १४ जणांची हत्या आणि त्यानंतर एक आत्महत्या... या घटनेमागचे कारण काय, हे कळले पाहिजे. मात्र, हे कृत्य करणाऱ्याला माणुसकी असेल, असे वाटत नाही. अक्षरश: लहान बाळांनाही त्याने क्रूरपणे मारले आहे.
-रीना राजोळे, गृहिणी, ठाणे
कुटुंबामध्ये जर काही वाद असतील, तर ते चर्चेने सोडवले पाहिजेत. कुटुंबातील सदस्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करणे म्हणजे आपणच आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहोत. या कृत्याला कुठेही माफी नाही.
-परवेज खान, एनजीओ सदस्य
कासारवडवलीत घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. घरातील सगळ्यांची हत्या करण्यामागे नेमके काय कारण होेते, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, इतक्या निर्दयपणे वागणाऱ्या दुष्प्रवृत्ती आजही आपल्या अवतीभोवती आहेत, याचे वाईट वाटते.
- अलका सावंत, गृहिणी, ठाणे
जन्म दिलेल्या आईवडिलांबरोबरच स्वत:च्या लहान मुलांसह कुटुंबातील इतर लहान मुलांची निर्दयपणे हत्या करणे म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. हे कृत्य जनावरांनाही लाजवणारे आहे.
- तबरेज कुरेशी, सामाजसेवक