गृहसंकुलात करता येणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST2021-06-06T04:29:50+5:302021-06-06T04:29:50+5:30
कल्याण : मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांनी वितरकांकडून स्वखर्चाने लस खरेदी करून योग्य शुल्क आकारुन थेट गृहसंकुलात लसीकरण करण्यास महापालिका आयुक्त ...

गृहसंकुलात करता येणार लसीकरण
कल्याण : मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांनी वितरकांकडून स्वखर्चाने लस खरेदी करून योग्य शुल्क आकारुन थेट गृहसंकुलात लसीकरण करण्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिली आहे. ३३ खासगी रुग्णालयांना मान्यता दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. महापालिका क्षेत्रात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने वेगाने लसीकरण व्हावे, हा या मान्यतेमागचा उद्देश असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ज्या आस्थापना आणि गृहसंकुले १८ आणि त्या पुढील नागरिकांसाठी सशुल्क लसीकरण करून घेण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी मान्यता दिलेल्या ३३ रुग्णालयांशी संपर्क करून लसीकरण करावे. मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांनी वितरकांकडून लस खरेदी करून लस उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध करावी. खासगी रुग्णालयांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ, वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून सरकारच्या कोविड पोर्टलमध्ये लाभार्थ्यांची आवश्यक माहिती भरून लसीकरण करावे, लसीकरणासाठी परवानगी दिलेल्या खासगी लसीकरण केंद्राच्या माहितीबरोबर हे धोरण महापालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.