कंत्राटदाराकडून होतोय तलावाचा वापर
By Admin | Updated: May 9, 2017 00:54 IST2017-05-09T00:54:15+5:302017-05-09T00:54:15+5:30
वाडेघर येथील कल्याण स्पोटर््स कॉम्प्लेक्समधील जलतरणतलावाच्या वापरावर बंदी असताना कंत्राटदार त्याचा वापर करत आहे.

कंत्राटदाराकडून होतोय तलावाचा वापर
कल्याण : वाडेघर येथील कल्याण स्पोटर््स कॉम्प्लेक्समधील जलतरणतलावाच्या वापरावर बंदी असताना कंत्राटदार त्याचा वापर करत आहे. तलावाचा वापर करणाऱ्यांकडून दिवसाला १००, तर महिन्याकाठी तीन हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. त्याला मनसेने हरकत घेतली आहे. कंत्राटदाराकडून सुरू असलेला गैरवापर बंद करावा, अन्यथा शाळेला सुटी लागल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी तलाव नि:शुल्क वापरास द्यावा, अशी मागणी केली आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाने याप्रकरणी केडीएमसीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची भेट घेत निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला आघाडीच्या शीतल विखणकर, नगरसेविका कस्तुरी देसाई, ऊर्मिला तांबे, तृप्ती भोईर आदी उपस्थित होते. त्यावर, कुलकर्णी यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
वाडेघर येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर बीओटी तत्त्वावर खाजगी विकसकाने मनोरंजन केंद्र व जलतरणतलाव बांधला आहे. मनोरंजन केंद्रात लग्नाचा हॉल आहे. या स्पोटर््स क्लबप्रकरणी मनसेने यापूर्वी आंदोलन केले होते. तसेच शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर काही वर्षांपूर्वी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला सील ठोकले होते. ते कोणी काढले, याचा जाब खुद्द शिवसेनेच्या नगरसेवकांनी दोन महिन्यांपूर्वीच्या महासभेत केला होता.
शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी कंत्राटदार लग्न सभारंभाच्या हॉलसाठी किती भाडे आकारतो, जलतरणतलावासाठी किती शुल्क आकारतो, याची यादीच महासभेत वाचली होती. तसेच पुन्हा कॉम्प्लेक्सला सील ठोकण्याची मागणी त्यांनी केली होती. या वेळी महासभेत समेळ यांची बोळवण करून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार प्रशासनाने केला होता. कंत्राटदार महापालिकेविरोधात न्यायालयात गेला आहे. कंत्राटदाराकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला गप्प केले जाते, यावर मनसेने आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिकेने डोंबिवलीतील क्रीडासंकुलातील तरणतलाव बंद ठेवल्याने मनसेने तेथे कोरड्या तलावात पोहण्याची स्पर्धा घेतली होती. त्यानंतर आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा मुद्दा हाती घेतला आहे.