दंडाच्या पावतीवर फोटो एका ठिकाणचे तर कारवाई दुसरीकडची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:07 AM2019-12-25T01:07:13+5:302019-12-25T01:11:21+5:30

वाहतूक पोलिसांचा नवा प्रताप : टार्गेटसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होते फोटोंची देवाणघेवाण

Upon receipt of the penalty, the photo is taken from one place to another | दंडाच्या पावतीवर फोटो एका ठिकाणचे तर कारवाई दुसरीकडची

दंडाच्या पावतीवर फोटो एका ठिकाणचे तर कारवाई दुसरीकडची

Next

ठाणे : ई-चलन प्रणाली सुरू झाल्यापासून वाहतूक पोलीस मोबाइल फोनवर बेशिस्त वाहनांचे फोटो काढून कारवाई करतात .मात्र, ती कारवाई करताना टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका वाहतूक पोलिसांकडून दुसऱ्या पोलिसाला व्हॉट्सअ‍ॅपवर काढलेल्या फोटोंची देवाणघेवाण सुरू झाल्याने दंडाच्या पावतीवर फोटो एका ठिकाणचे आणि कारवाईचे ठिकाण भलतेच असे प्रकार दिवसेंदिवस ठाण्यात वाढू लागले आहेत. यामुळे रिक्षाचालकांपासून चारचाकी वाहनचालकांचे दंडाच्या रक्कमेने नाहक कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रकार वाहतूक पोलीस दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी करत असल्याचा आरोप आता दंडामुळे भडलेल्या चालकांकडून उघडउघड केला जात आहे. तर दुसरीकडे ,वाहतूक पोलिसांनी याबाबत असे प्रकार घडत नसल्याचे म्हटले आहे.

ई-चलन प्रणाली सुरू होऊन जवळपास दहा महिने झाले आहेत. त्यातच बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी ३०० ई-चलन मशीन १८ वाहतूक उपशाखांमध्ये वितरीत केल्या आहेत. यामध्ये नारपोली व मुंब्रा या उपशाखांना प्रत्येकी २०-२० तर कोपरी, विठ्ठलवाडी आणि कोनगाव या उपशाखांना प्रत्येकी दहा-दहा आणि उर्वरित उपशाखांना प्रत्येकी १५-१५ मशीनांद्वारे कारवाई सुरू आहे. यामुळे आता वाहतूक पोलीस व वाहनचालक यांच्यातील वादाचे प्रकार काही थांबले आहेत .परंतु, वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे पोलिसांमार्फत मोबाइलद्वारे फोटो काढून त्या-त्या वाहनचालकांना दंडाची पावती पाठवली जाते. त्यातूनच पोलिसांचा हा नवा प्रताप पुढे आला. यामध्ये पोलीस मोबाइलवर फोटो काढून. नंतर तो इतर वाहतूक उपशाखांमधील सहकाºयांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवतात. त्यानंतरत्याची पावती बनवून ती वाहनचालकांना पाठवण्यात येत आहे.

ई-चलनामुळे वाहतूक पोलिसांची मलाई बंद झाल्याने प्रामाणिकपणे रिक्षा चालवणाºयांना त्यांच्याकडून त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणच्या रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांना हप्ते सुरू आहेत. त्या ठिकाणचे रिक्षाचालक या अशा कारवाईपासून अलिप्त राहत आहेत. वाहतूक पोलीस फोटो काढतात. त्याची पावती तातडीने येणे गरजेचे असते. पण, ती रात्री उशीरा येते. कधी-कधी तर ती पावती मध्यरात्री येते. हे प्रकार टार्गेट पूर्ण करण्यासाठी केले जात असल्यामुळे फोटो एका ठिकाणचे आणि कारवाईचे दाखवलेले ठिकाण भलतेच असल्याचे येणाºया पावत्यांवरून दिसत आहे.
- रिक्षाचालक, ठाणे (नाव न छापण्याच्या अटीवर)

बनावट नंबरप्लेटचे प्रकार वाढले
ई-चलन प्रणाली सुरू झाल्यानंतर कारवाई वाचविण्यासाठी बनावट नंबरप्लेटचे प्रकार वाढले होते. त्या संदर्भात मध्यंतरी आरटीओ कार्यालयात चालकांकडून तक्रारी वाढण्यात सुरूवात झाली होती.

अद्यापतरी असे प्रकार निदर्शनास आलेले नाहीत. महसूल गोळा करणे हे वाहतूक पोलिसांचे काम नसल्याने वाहतूक पोलिसांना कोणतेही टार्गेट दिले जात नाही, मात्र असे प्रकार होत असतील तर त्याबाबत माहिती घेतली जाईल.
- अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर

Web Title: Upon receipt of the penalty, the photo is taken from one place to another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस