रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्ड अंडरग्राऊंड करा
By Admin | Updated: March 9, 2017 03:15 IST2017-03-09T03:15:39+5:302017-03-09T03:15:39+5:30
ठाण्याचा स्टेशन परिसर आमूलाग्र सुधारणे ही काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्पामुळे काही अंशी वाहतुकीत सुधारणा झाली असली, तरी ती आजच्या घडीला अपुरी आहे.

रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्ड अंडरग्राऊंड करा
ठाणे : ठाण्याचा स्टेशन परिसर आमूलाग्र सुधारणे ही काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्पामुळे काही अंशी वाहतुकीत सुधारणा झाली असली, तरी ती आजच्या घडीला अपुरी आहे. तेथील वाहतूक कोंडी फोडाण्यासाठी एकतर तेथील रिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड आदी वाहतुकीची पर्यायी साधने परदेशाप्रमाणे अंडरग्राऊंड करण्याची गरज आहे. स्टेशन परिसरातील काही दुकानेही याचपद्धतीने अंडरग्राऊंड केल्यास त्यांनाही चांगली जागा मिळेल आणि स्टेशन परिसरातील कोंडी पुटेल, असे मत ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी मांडले.
ठाणे पूर्वेचा सॅटीस प्रकल्प पूर्ण करण्यापूर्वी कोपरी पुलाचे रखडलेले काम आधी मार्गी लागणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. ठाण्यात येणारी मेट्रोही या भागातून वळवल्यास स्टेशन परिसरातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ठाण्याच्या अर्थसंकल्पाबाबत अनेक उपयुक्त सूचना करताना ते बोलत होते.
स्टेशन परिसरात सुधारणा करण्यासाठी प्रथम हा परिसर हॉकर्स झोन होणे गरजेचे आहे. हा परिसर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला असला, तरी तेथे आजही फेरीवाल्यांचे प्रस्थ दिसून येते. त्यामुळे आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास हा परिसर फेरीवालामुक्त होणे हे काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्प झाल्याने येथील वाहतूक कोंडी थोड्या फार प्रमाणात का होईना सुटली आहे. तरीदेखील गोखले रोड, शिवाजी चौक येथील रस्त्यांवर आजही वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बी कॅबीन भागात रेल्वेची जी काही जागा शिल्लक आहे, त्या जागेचा वापर कशा पध्दतीने करता येऊ शकतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
परदेशात स्टेशन परिसरातील वाहतुकीच्या सुविधा किंवा इतर पूरक सुविधा अंडरग्राऊंड स्वरुपात पुरवल्या जातात. ही बाब खचर््िाक जरी असली, तरी ठाणे स्टेशनचा विस्तार, तेथील गर्दी लक्षात घेऊन या पध्दतीने अंडरग्राऊंड वाहतुकीचा प्रयोग केला, तर मोठ्या प्रमाणात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतील. किंबहुना रिक्षा स्टँड आणि टॅक्सी स्टँडही अंडरग्राऊंड केल्यास ते ही फायदेशीर ठरु शकतील. स्टेशन परिसरात पार्किंगची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात का, रेल्वेच्या जागेचा वापर पार्किंगसाठी करता येऊ शकतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ठाण्यात येणाऱ्या मेट्रोचा मार्ग स्टेशन परिसरातून वळवल्यास वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल आणि स्टेशन परिसरातील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी सूचनाही जंत्रे यांनी केली. (प्रतिनिधी)
- ठाणे पूर्वेला जागा कमी आहे. तेथील सॅटीस प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर, प्राधान्याने कोपरी पुलाचे काम होणे अतिशय गरजेचे आहे. पार्किंगची व्यवस्था, बसथांब्याची व्यवस्था, नागरिकांना चालण्याची सुविधा यांचाही आधी विचार होणे अपेक्षित आहे. नवीन ठाणे स्टेशनचे काम जलद गतीने मार्गी लावायला हवे.