गुप्त खोल्या जमीनदोस्त
By Admin | Updated: March 31, 2017 05:53 IST2017-03-31T05:53:14+5:302017-03-31T05:53:14+5:30
अनैतिक व्यवसायाचे केंद्र बनलेले आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या बेकायदा बांधकामांवर पोलीस व लोकप्रतिनिधींच्या

गुप्त खोल्या जमीनदोस्त
मीरा रोड : अनैतिक व्यवसायाचे केंद्र बनलेले आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या बेकायदा बांधकामांवर पोलीस व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कारवाई करून अहवाल द्या, अशी तंबी आयुक्तांनी दिल्यानंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी तीन बारमधील पाच गुप्त खोल्या तोडल्या. दोन बारचालकांनी स्वत:हून खोल्या तोडल्या, अशी माहिती अतिक्रमणविरोधी विभागाने दिली. पण, बार व लॉजच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेकडून कारवाई होत नसल्याचे वृत्त १८ मार्चच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर, आयुक्तांनी उपायुक्तांना कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
काशिमीरा प्रभाग समिती क्रमांक-६मध्ये सर्वात जास्त बार, लॉज आहेत. शिवाय, प्रभाग समिती क्र. ३,४ व ५ मध्येदेखील याची संख्या मोठी आहे. प्रभाग समिती क्र. १ मध्ये लॉज मोठ्या प्रमाणात आहेत. या बहुतांश आॅर्केस्ट्रा बार व लॉजमधून सर्रास शरीरविक्रय चालत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. आॅर्केस्ट्रा बार व लॉजची बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी सातत्याने पोलिसांसह काही लोकप्रतिनिधी व संस्थांनी केली आहे. बार व लॉजमध्ये बारबाला किंवा शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना पोलीस कारवाईच्यावेळी लपण्यासाठी गुप्त खोल्या तयार केल्या आहेत. अत्यंत कोंदट व छोट्याशा खोलीत बारबालांना दाटीवाटीने कोंबले जाते.
मध्यंतरी, उपायुक्त दीपक पुजारी यांनी शहरातील काही आॅर्केस्ट्रा बार व लॉजचालकांची स्वत:च्या दालनात बैठक घेऊन त्यांना फक्त गुप्त खोल्या तोडण्याचा सल्ला दिला होता. पोलिसांच्या कारवाईला दाद न देणाऱ्या तसेच सर्रास बेकायदा बांधकाम करणाऱ्या या बार-लॉजवर धडक कारवाईऐवजी त्यांना फक्त गुप्त खोल्या काढून घेण्याचा प्रेमळ सल्ला वादग्रस्त ठरला. ‘लोकमत’मधील बातमीनंतर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी पुजारी यांना पत्र दिले. वारंवार पत्र देऊन, प्र्रत्यक्ष सांगून चार महिने उलटले तरीही बार, लॉजवर कारवाई न झाल्याबद्दल खेद व्यक्त करत कारवाई करून अहवाल देण्यास आयुक्तांनी बजावले होते.
या अनुषंगाने प्रभाग समिती क्रमांक-६मधील दहिसर चेकनाक्यापासून प्रभाग अधिकारी, पोलिसांनी सात आॅर्केस्ट्रा बार-लॉजची पाहणी करून गुप्त खोल्या शोधण्याचा प्रयत्न केला. यात गोदावरी लॉज, स्पिनिक्स डान्सबार तथा स्प्रिंग लॉजमध्ये गुप्त खोल्या सापडल्या नाही. मॅट्रिक्स व सी मॅजिक बारमधील गुप्त खोली बार चालकाने स्वत:हून तोडल्याची माहिती प्रभाग अधिकारी संजय दोंदे यांच्याकडून देण्यात आली. मंत्रा, मेमसाबमधील प्रत्येकी १ व कशिश बारमधील तब्बल ३ अशा ५ गुप्त खोल्या पालिकेने तोडल्या. दरम्यान, गुरूवारीही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
महापालिकेची सोयीस्कररीत्या बगल
संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असून शहरातील अन्य बार व लॉजमधील गुप्त खोल्या तोडल्या जाणार आहेत, असे पालिका सूत्रांनी सांगितले.
परंतु, या बार व लॉजची बेकायदा बांधकामे तोडण्याचा मुख्य मुद्दा व मागणीला मात्र पालिकेने सोयीस्कर बगल दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.