कोणार्क आघाडीत अस्वस्थता
By Admin | Updated: May 13, 2017 00:48 IST2017-05-13T00:48:35+5:302017-05-13T00:48:35+5:30
भाजपामधील निष्ठावंत आणि संघ परिवाराचा विरोध दिवसेंदिवस कडवा होत गेल्याने आपल्या उमेदवारांना धोका निर्माण होऊ शकतो,

कोणार्क आघाडीत अस्वस्थता
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भाजपामधील निष्ठावंत आणि संघ परिवाराचा विरोध दिवसेंदिवस कडवा होत गेल्याने आपल्या उमेदवारांना धोका निर्माण होऊ शकतो, या कल्पनेने कोणार्क विकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी कोणार्कने भाजपाशी समझोता केल्याने तो पक्ष कडव्या झुंजीच्या तयारीने उतरला आहे. काँग्रेसचा कोणार्कला विरोध आहेच, पण इतर सर्व पक्षांनीही भाजपासोबत कोणार्कशीही लढण्याचे ठरवल्याने त्यात भर पडली आहे.
मागील निवडणुकीनंतर अवघ्या सहा जागा असूनही कोणार्कआघाडी महापौरपद पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली होती. आताही त्यांना महापौरपद हवे आहे. त्याचवेळी भाजपाच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे खासदार कपिल पाटील यांना त्यांच्या पुतण्याला त्या पदावर संधी द्यायची आहे. त्यामुळे जागावाटपाचा समझोता करूनही आतापासूनच या दोन्ही पक्षांत या पदासाठी सुप्त स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात दोन्ही पक्षांपैकी कुणाच्या किती जागा येतात यानुसार तो पक्ष वरचढ ठरेल, हे नक्की. कोणार्कआघाडी २२ आणि भाजापा ६० जागा लढवत असले, तरी त्यांनी आणखी एक-दोन जागांवर काही उमेदवारांवर गळ टाकला आहे. भाजपा लढवत असलेल्या जागा अधिक असल्या, तरी त्या पक्षाचा तेवढा विस्तार नाही, ही मुख्य अडचण आहे.
मात्र भाजपाला हात देऊनही पक्षातील निष्ठावंत आणि नवभाजपावाद्यांतील संघर्ष तीव्र झाल्याने त्याचा फटका कोणार्कला बसू लागला आहे. दोन प्रभागात संघ आणि परिवारातील इतर संघटनांनी थेट विरोधाचे अस्त्र उगारल्याने कोणार्कमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
एकीकडे भाजपा नेते समझोता झाल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष वॉर्डावॉर्डांत तो समझोता नाकारला जात आहे. भाजपाने कोणार्क विरोधात उमेदवार उतरवलेले नाहीत. एकवेळ भाजपा कार्यकर्त्यांनी कोणार्कचा प्रचार केला नाही तरी चालेल, पण इतर पक्षांसारखा त्यांच्या कार्यकर्त्यांनी संघ परिवाराने विरोध सुरू केला, तर उमेदवारांची प्रचंड कोंडी होईल, या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे भाजापासोबत असूनही कोणार्क आघाडी एकला चलो रे या पद्धतीने काम करत आहे.
भाजपाला भिवंडीत अन्य पक्षाकडून उमेदवारांना फोडण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे कोणार्कसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संघाने विरोध करण्यास सुरुवात केली आहे.