उल्हासनगर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने नेमलेल्या ठेकेदाराने परवानगीतील अटी शर्तीचे उल्लंघन करून क्रिटीकेअर हॉस्पिटल ते टाऊन हॉल दरम्यानचा सार्वजनिक रस्ता खोदून ४७ लाख ५२ हजारांचे नुकसान केले. महापालिकेने याबाबतची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल हॉस्पिटल ते टाऊन हॉल दरम्यानचा सार्वजनिक रस्ता ऐन पावसाळ्यात खोदल्याने वाहतूक कोंडीसह अन्य समस्या निर्माण झाली.
रस्ता खोदणारा ठेकेदार कोण?
महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी याबाबत चौकशी केली असता. महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे ठेकेदार सुदर्शन इलेक्ट्रिकल कंपनीचे ठेकेदार नितीश सावंत यांनी रस्ता खोदल्याचे त्यांना चौकशीतून कळले.
महावितरणच्या ठेकेदाराने परवानगीतील अटी शर्तीचे उल्लंघन करून रस्ता खोदून महापालिकेचे ४७ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी महापालिकेने ठेकेदार नितीश सावंत यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला.
महापालिकेने ठोठावला ४७ लाखांचा दंड
महापालिकेने सार्वजनिक रस्ता परवानगीतील अटी शर्तीचे उल्लंघन करून खोदल्या प्रकरणी महावितरणच्या ठेकेदाराला ४७ लाख ५२ हजारांचा दंड ठोठावला आहे. याकारवाईने अन्य ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मोठे ठेकेदार शहरातील सार्वजनिक रस्ते विकास कामाच्या नावाखाली खोदून अटी शर्तीचे सर्रासपणे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर महापालिका गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई वसूल करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी मात्र परवानगीतील अटी शर्तीचे उल्लंघन करणाऱ्यावर अशीच कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहे.