उल्हासनगर महापालिकेची आरोग्य केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:12+5:302021-04-19T04:37:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने गेल्यावर्षी वेदांत कॉलेज, आयआयटी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, टाऊन हॉल, टेऊराम हॉल ...

उल्हासनगर महापालिकेची आरोग्य केंद्र बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेने गेल्यावर्षी वेदांत कॉलेज, आयआयटी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, टाऊन हॉल, टेऊराम हॉल आदी ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले आरोग्य केंद्र कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने बंद केले. मात्र कोरोना दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेल्या आरोग्य केंद्राची आठवण महापालिकेला होऊन त्यापैकी टाऊन हॉलमध्ये पुन्हा लाखोंचा खर्च करून आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. तर सरकारी प्रसूतिगृहाचे पुन्हा कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कॅम्प नं ४ येथील सरकारी प्रसूतिगृह रुग्णालय ताब्यात घेऊन त्यांचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. या रुग्णालयामुळे शेकडो रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचा जीव वाचला. त्यानंतर लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांसाठी भिवंडी येथील टाटा आमंत्रणमध्ये कोट्यवधींचा खर्च करून सुखसुविधा पुरविली. रुग्ण संख्या वाढल्याने महापालिकेने वेदांत कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, आयटीआय कॉलेज, टाऊन हॉल, तहसील कार्यालयाची नवीन इमारत आदी ठिकाणी आरोग्य केंद्रे उभी केली. तसेच १८ लाख खर्चून साई प्लॅटिनम रुग्णालयाला ऑक्सिजन पाइपची जोडणी करून दिली. तर टाऊन हॉलमध्ये ऑक्सिजन पाइप जोडणीसह इतर खरेदीवर कोट्यवधींपेक्षा जास्त खर्च केला. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती केली. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरल्यावर आरोग्य केंद्रासह त्यातील साहित्य धूळखात राहिल्याने. त्यावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याची टीका होत आहे.
कोरोनाची लाट ओसरली असल्याचे बोलले जात असताना, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी खाजगी साई प्लॅटिनम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. रुग्णालयात एकूण २०० बेड असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची संख्या १५० पेक्षा जास्त आहे. गेल्यावर्षी भिवंडी येथील टाटा आमंत्रण येथे ४०० बेड, डॉ. आंबेडकर अभ्यासिकेत १५६ बेड, वेदांत कॉलेजमध्ये १५० बेड, कामगार हॉस्पिटल ९० बेड, आयटीआय कॉलेज ९० तसेच सरकारी रुग्णालयात एकूण ३५६, खासगी रुग्णालयात ८४० असे एकून दोन हजारांपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध होते. सद्य:स्थितीत वेदांत कॉलेज, डॉ. आंबेडकर अभ्यासिका, टाऊन हॉल, कामगार रुग्णालय आरोग्य केंद्र बंद असून त्यावर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.