उल्हासनगर, दिव्याची कपात रद्द

By Admin | Updated: December 28, 2016 04:11 IST2016-12-28T04:11:34+5:302016-12-28T04:11:34+5:30

उल्हासनगर, दिवा आणि कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांतील पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे निवडणुकीच्या

Ulhasnagar, the cancellation of the lamp | उल्हासनगर, दिव्याची कपात रद्द

उल्हासनगर, दिव्याची कपात रद्द

कल्याण : उल्हासनगर, दिवा आणि कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांतील पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उल्हासनगर आणि दिव्याला मोठा दिलासा मिळाला आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झालेले असल्याने जादा पाणी साठवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
त्याचवेळी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालिकांनी आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव पाण्याची मागणी करावी. पुढील बैठकीत हा वाढीव कोटा मंजूर करावा, असाही निर्णय घेण्यात आला.
यंदा उत्तम पाऊस पडला. चांगला पाणीसाठा उपलब्ध असूनही अवघ्या दोनच महिन्यात उल्हासनगर, दिवा आणि २७ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात तातडीची बैठक झाली. तिला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, सुभाष भोईर, महापौर अपेक्षा पाटील, राजेंद्र देवळेकर, जलसंपदा विभाग, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावे, दिवा आणि उल्हासनगर शहराला वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे लगेच सादर करावा, सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करावा, कोणत्याही प्रकारे पाणीकपात करू नये, असे निर्देश शिंदे यांनी एमआयडीसी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पाण्याचा जादा कोटा देण्यासाठी एमआयडीसीने जलसंपदा विभागाला सुधारीत करारनामा सादर करावा, असे उद्योगमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा प्रस्ताव मंजूर करून पाणीटंचाईची समस्या कायमची दूर करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिले. (प्रतिनिधी)

बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे प्रस्ताव लवकरच

बारवी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यास सुरूवात झाल्यावर ३४० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होईल. पाण्याची वाढीव गरज भागवणे शक्य होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झाले की वाढीव पाणीसाठा उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांना उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे पालिकांमध्ये सामावून घेण्यात येणार असून त्यासाठी लवकर प्रस्ताव सादर करण्याची सूचना शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली.

गावांत नळजोडण्या
कल्याण-डोंबिवली महापालिकेला गावांमध्ये नळ जोडण्या, तसेच टँकर फिलिंग पॉर्इंट आवश्यक आहेत. ते एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी द्यावे, असे पालकमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Ulhasnagar, the cancellation of the lamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.