उल्हासनगर भाजपातील फूट टाळण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: December 28, 2016 04:02 IST2016-12-28T04:02:43+5:302016-12-28T04:02:43+5:30
ओमी कलानी टीमला प्रवेश देण्यावरून पक्षात पडणारी फूट टाळण्यासाठी पक्षनेतृत्वाने तातडीने तीन असंतुष्टांचा कोअर कमिटीत समावेश करून पक्षातील वाद शमवण्याचा प्रयत्न

उल्हासनगर भाजपातील फूट टाळण्याचे प्रयत्न
उल्हासनगर : ओमी कलानी टीमला प्रवेश देण्यावरून पक्षात पडणारी फूट टाळण्यासाठी पक्षनेतृत्वाने तातडीने तीन असंतुष्टांचा कोअर कमिटीत समावेश करून पक्षातील वाद शमवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानंतरही पक्षहितासाठी कलानी प्रवेशाचा विषय सोडलेला नाही, असे सांगत या असंतुष्टांचे प्रतिनिधी, पक्षाचे महासचिव प्रदीप रामचंदानी यांनी भूमिका कायम ठेवली आहे. पक्षातील पक्षातील टक्के असंतुष्ट पदाधिकारी व नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कलानी यांच्या प्रवेशामुळे शिवसेना नाराज होऊ नये म्हणून रिपाइंपाठोपाठ भाजपा नेत्यांनी सेनेशीही प्राथमिक वाटाघाटी केल्या आहेत. युतीत मागील निवडणुकीसारख्या निम्म्या जागांचे वाटप होणार की नवा फॉर्म्युला ठरवला जाणार हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पष्ट होईल.
कलानी यांना पक्षप्रवेश न दिल्यास पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या टीममध्ये दाखल होण्याची उघडउघड तयारी केल्याने तातडीने शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी नगरसेवक जमनुदास पुरस्वानी, राजा वानखडे, प्रकाश माखीजा, महेश सुखरामणी यांचा कोअर कमिटीत समावेश केला.
भाजपाला उल्हासनगरचे महापौरपद मिळवायचे असल्यास ओमी कलानी टीमला प्रवेश देण्याची मागणी पक्षातील एका गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यानी प्रवेशाला हिरवा कंदील दाखवताच कुमार आयलानी गटाने आपल्या राजकीय अस्तित्वाचा विषय समोर आणत कलानी टीमला विरोध केला. त्यावर कोअर कमिटीमार्फत शिक्कामोर्तब घडवून आणले, तर पक्षाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, माजी शहरजिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, लाल पंजाबी, जमनुदास पुरस्वानी, प्रकाश मखिजा, राम चार्ली या गटाने कलानी टीमला पाठिंबा देत प्रवेशाची मागणी लावून धरली.
दरम्यान, कोअर कमिटीत आयलानी यांची पत्नी मीना, त्यांच्या कार्यालयातील मंगला चांडा, राजा गेमनानी, त्यांचे नातेवाईक व त्यांच्या पक्षातील मित्रांचा समावेश असल्याचा आरोप करत विरोधकांनी या कमिटीच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यातून कोअर कमिटीतील आयलानी यांच्या वर्चस्वालाच धक्का देण्याची रणनीती पक्षातील विरोधकांनी आखल्याचे स्पष्ट झाले.
त्याचवेळी निवडणुकीच्या तोंडावर कलानींचा भाजपा प्रवेश होईल, असे पक्षातील एका गटाने ठामपणे सांगण्यास सुरूवात केली आहे. (प्रतिनिधी)
जानेवारीत जागावाटप
पक्षातील फूट टाळण्यासाठी विरोधकांना कोअर कमिटीत स्थान द्यावे लागल्यानंतर भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी लगेचच युतीसंदर्भात शिवसेनेशी वाटाघाटी करून पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी केली.
ओमी कलानी यांच्या टीमला प्रवेश देऊन शिवसेनेला बाजुला ठेवण्याची खेळी त्यांच्या विरोधी गटाने चालवली आहे.
तिला शह देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, कल्याण लोकसभा जिल्हाउपप्रमुख चंद्रकांत बोडारे, गटनेते सुभाष मनसुलकर, धनंजय बोडारे यांच्यासोबत त्यांनी युतीची प्राथमिक चर्चा केली.
रिपाइंसोबत मंगळवारी रात्री चर्चा करणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. जानेवारीच्या पहिल्या आठवडयात जागा वाटपाबाबतची चर्चा होईल, असे ते म्हणाले.