इमारतीच्या टेरेसवर विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST2021-08-20T04:46:07+5:302021-08-20T04:46:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजन्सी प्लाझा इमारतीच्या टेरेसवर काम करणाऱ्या दोन कामगारांना बुधवारी रात्री ...

Two workers die after being struck by lightning on the building's terrace | इमारतीच्या टेरेसवर विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू

इमारतीच्या टेरेसवर विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजन्सी प्लाझा इमारतीच्या टेरेसवर काम करणाऱ्या दोन कामगारांना बुधवारी रात्री ८ च्या दरम्यान विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन विभागाने दोन्ही मृतदेह काढून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

उल्हासनगर, शांतीनगर येथील रिजन्सी प्लाझा इमारतीच्या टेरेसवर, इमारतीमध्ये काम करणारे कामगार विवेक सिंग व रामनारायण पंडित हे दोघे भरपावसात काम करीत होते. यावेळी इमारतीच्या भिंतीलगत जाणाऱ्या उघड्या विद्युतवाहिनीतून विजेचा धक्का दोघांना बसला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. इमारतीमधील नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यावर, त्यांनी वीजपुरवठा खंडित करून दोघांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. मध्यवर्ती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. मृत कामगारांच्या नातेवाइकांचा शोध पोलीस घेत असून रिजन्सी प्लाझा इमारत व्यवस्थापनासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two workers die after being struck by lightning on the building's terrace